त्रिशतकवीर करुण नायरचे काय चुकले?; गावसकर भडकले

वृत्तसंस्था
Saturday, 8 September 2018

करुण नायरचा इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 18 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आलेला मात्र त्याला एकाही सामन्यात अंतिम संघात स्थान मिळाले नाही. त्याने मार्च 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला आहे.

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात फलंदाज करुण नायरला संघात जागा न दिल्यामुळे क्रिकेट वर्तुळातील मान्यवरांनी निवड समितीवर निशाणा साधला आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात हार्दिक पंड्याऐवजी नवोदित फलंदाज हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले. तसेच भारताचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनला दुखापत झाल्याने त्याच्याजागी भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला संधी देण्यात आली. 

करुण नायरचा इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 18 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आलेला मात्र त्याला एकाही सामन्यात अंतिम संघात स्थान मिळाले नाही. त्याने मार्च 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. 

करुण नायरच्या नावावर त्रिशतक असूनही त्याचा संघात समावेश केला जात नसेल तर त्याचा जाब विचारण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे असे मत भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी मांडले आहे. ते म्हणाले, ''किती भारतीयांनी आजवर त्रिशतके केली आहेत? वीरेंद्र सोहवागने दोनदा आणि करुण नायरने एकदा. असे असूनही जर त्याला संघात घेतले जात नसेल तर आमच्यामते तु चांगला खेळाडू नाहीस असा संदेश तुम्हाला द्यायचा आहे का? करुण नायरला संघ व्यवस्थापनाला आपण कोठे चुकलो आहोत का हे विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याला उत्तर देण्यास संध व्यवस्थापन बांधिल आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताची फलंदाजी हीच भारताची खरी डोकेदुखी ठरत असताना करुण नायरला एकही संधी देण्यात आली नाही. हार्दीक पंड्या तिसऱ्या सामन्याचा अपवाद वगळता सलग सर्व सामन्यांमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत अपयशी होत असताना करुण नायरला संघाबाहेर बसवण्याचा कोहलीचा निर्णय कितपत योग्य होता यावर आता सर्वत्र चर्चा होत आहे. यातच आकाश चोप्रा, हर्षा भोगले, सुब्रमण्यम बद्रिनाथ यांनीही निवड समितीवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या