सुशांत सिंहचा दाखला देत या भारतीय गोलंदाजाने केलं खळबळजनक वक्तव्य

टीम ई-सकाळ
Monday, 22 June 2020

सभोवतालची परिस्थिती ही मानसिक तणाव निर्माण करणारी असली तरी खचणार नाही.

कोलकाता : 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात महेंद्र सिंह धोनीची हुबेहुब भूमिका साकारणाऱ्या सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. ही घटना बॉलिवूडसह देशातील सर्व सामान्य लोकांना धक्का देणारी अशी होती. त्याने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा रंगत असताना बॉलिवूडमधील घराणेशाही आणि ठराविक जणांच्या मक्तेदारीचा प्रकार त्याच्या तणावाला कारणीभूत होता हा मुद्दा उपस्थितीत करण्यात येत आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांनी या मुद्यावर जोर दिल्यानंतर आता भारतीय क्रिकेटरनेही आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. मोजक्या सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या अशोक दिंडाने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रंगलेल्या ठराविक कुटुंबियांच्या मक्तेदारीवर खळबळजनक वक्तव्य केले आहे. 

आता झोप घेऊ शकतो; युवीनं व्यक्त केली मनातील भावना

अशोक दिंडा याने म्हटलंय की, सुशांत सिंह राजपूतला ज्या परिस्थितीतून जावे लागले त्याच प्रकारचा सामना अनेक क्षेत्रात करावा लागतो. सभोवतालची परिस्थिती ही मानसिक तणाव निर्माण करणारी असली तरी खचणार नाही, असेही दिंडा पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला. रणजी ट्रॉफीच्या मागील हंगामात राजकारणाचा शिकार झाल्याचा दावा अशोक दिंडाने केला होता. मैदानातील अखिलाडूवृत्तीचे कारण देत बंगाल क्रिकेट असोसिएशने त्याला अर्ध्यावरुन संघाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता रणजीच्या नव्या हंगामात नव्या संघासह दमदार करण्यास सज्ज असल्याचे संकेतही त्याने यावेळी दिले.  उत्पल चटर्जीनंतर बंगालकडून सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या दिंडाला गोलंदाजी प्रशिक्षक राणादेब बोस यांच्यासोबत झालेल्या वादानंतर संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या वादानंतर बंगालने रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मजल मारली पण त्यांना उपविजेतपदावरच समाधान मानावे लागले. 

मी पुन्हा देशासाठी खेळण्यास उत्सुक : श्रीसंत

पीटीआयच्या वृत्तानुसार सध्याच्या घडीला इतर संघाकडून दिंडाला विचारणा केली जात आहे.दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी लवकरच तो बंगाल क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करणार आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिंडाने 116 सामन्यात 420 विकेट घेतल्या आहेत. यापुढे बंगाल क्रिकेटकडून खेळणार नसल्याचेही दिंडाने म्हटले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये क्रिकेटमधील राजकारणावर भाष्य करताना दिंडाने सुशांत सिहं राजपूतचे उदाहरण दिले. सुशांत सिंह राजपूत कोणत्या परिस्थितीतून गेला याची सर्वांना कल्पना आली आहे. हा प्रकार फक्त बॉलिवडूपूरता मर्यादित नाही. सर्वच क्षेत्रात असा प्रकार दिसून येतो. स्वत: मानसिकदृष्ट्या सक्षम असून कधीही नकारात्मक पाउल टाकणार नाही, असेही दिंडा यावेळी म्हणाला. दिंडाने 13 वनडे आणि 9 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या