CPL2020 : चॅम्पियन ब्रावोचा सुपर डुपर कॅच एकदा पाहाच!

सुशांत जाधव
Friday, 21 August 2020

अली खानच्या गोलंदाजीवर डीजे ब्रावोने त्याचा सुरेख झेल टिपल्याचे पाहायला मिळाले.

वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन लीगमध्ये ट्रिनबगो नाइट रायडर्सने सलग दुसऱ्या विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वलस्थान गाठले आहे. लीगमधील सहाव्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या जमेका तलावाजला नाइट रायडर्स संघाने निर्धारित 20 षटकात अवघ्या 8 बाद 135 धावांत रोखले. पहिल्या सामन्यातील विजयी धडाका कायम ठेवत ट्रिनबगो नाइट रायडर्सने हा सामना 18.1 षटकात 7 गडी राखून जिंकला. सहाव्या सामन्यात जमेका तलावाजकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 58 तर ट्रिनबगो नाइट रायडर्सकडून सुनील नरेनने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. 

कॅरेबियन लीगमधील सहाव्या साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या जमेका तलवाजची सुरुवात खराब झाली. अली खानने दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर वॉल्टनला फवाद अहमदकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. त्याच्यापाठोपाठ निकोलस किरटोहीन शून्यावर बाद झाला. आघाडीचे गडी शून्यावर बाद झाल्यानंतर ग्लेन फिलिप्सने 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र त्याला दुसऱ्या बाजून म्हणावी तशी साथ मिळाली नाही. जमेकाचा कर्णधार रावमॅन पॉवेल अवघ्या 8 धावा करुन माघारी फिरला. अली खानच्या गोलंदाजीवर डीजे ब्रावोने त्याचा सुरेख झेल टिपल्याचे पाहायला मिळाले. लीगमधील आतापर्यंच्या सामन्यातील हा सर्वोत्तम झेल ठरला. ब्रावोने ग्लेन फिलिप्सला बाद करण्यातही योगदान दिले. गोलंदाजीमध्ये त्याने आंद्रे रसेलच्या रुपात महत्त्वपूर्ण विकेट घेतली.  

लेंडल सिमन्स पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर सुनील नरेन (53) आणि  कॉलिन मुन्रो नाबाद  49 धावांच्या जोरावर  नाइट रायडर्सने सहज विजय मिळवला. कॉलिन मुन्रोने आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून देत 46 चेंडूत 49 धावा केल्या. यात 5 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. 


​ ​

संबंधित बातम्या