रोनाल्डोला सलामीलाच रेड कार्ड तरीही युव्हेंटिसचा विजय

वृत्तसंस्था
Thursday, 20 September 2018

रोनाल्डोविना खेळतानाही रेयाल माद्रिदने ताकद दाखवली. त्यांनी रोमाचा 3-0 असा सहज पराभव केला. पूर्वार्धातील निसटती आघाडी रेयालने उत्तरार्धात जास्त भक्कम केली. मॅंचेस्टर युनायटेडने 3-0 विजयासह गटात आघाडी घेतली. बायर्न म्युनिकने बेनिफिकाचा 2-0 असा सहज पाडाव केला. ऍजाक्‍सने गटात सुरवातीस आघाडी घेताना एईके अथेन्सला 3-0 नमवले. 

लिऑन : ख्रिस्तियानो रोनाल्डोला करारबद्ध केल्यामुळे जास्त प्रकाशात आलेल्या युव्हेंटिसने चॅंपियन्स लीगमध्ये विजयी सलामी देताना व्हॅलेन्सियाचा 2-0 असा पाडाव केला, पण रोनाल्डोच्या रेड कार्डचीच जास्त चर्चा राहिली. त्यामुळे लिऑनचा मॅंचेस्टर सिटीविरुद्धचा विजयही काहीसा झाकोळला गेला. 

रेयाल माद्रिदच्या चॅंपियन्स लीगवरील हुकमतीत मोलाचा वाटा असलेल्या रोनाल्डोचा युव्हेंटिसकडूनच चॅंपियन्स लीगमधील सामना अर्ध्या तासाचाच झाला. रोनाल्डोची व्हॅलेन्सियाचा बचावपटू जैसन मुरिलो याच्याबरोबर टक्कर झाली. मुरिलो मैदानातच कोलमडला. त्याने चेहरा झाकून घेतला होता. त्यानंतर रेफरी फेलिक्‍स ब्रिच यांनी सहायक रेफरींबरोबर चर्चा करून रोनाल्डोला रेड कार्ड दाखवले. 

व्हिडिओ असिस्टंट रेफरी असते तर योग्य निर्णय झाला असता, अशी टिप्पणी युव्हेंटिस मार्गदर्शक मॉस्सीमिलानो ऍलेग्री यांनी केली. 

रोनाल्डो मैदानात असेपर्यंत युव्हेंटिसची एकतर्फी हुकमत होती. त्यानंतरही त्यांनी वर्चस्व राखले आणि पूर्वार्धाच्या अखेरीस आणि उत्तरार्धाच्या सुरवातीस लाभलेल्या पेनल्टी किकवर गोल करीत आघाडी घेतली आणि त्यानंतर इटलीतील या संघाने चांगला बचाव केला. 

रोनाल्डोविना खेळतानाही रेयाल माद्रिदने ताकद दाखवली. त्यांनी रोमाचा 3-0 असा सहज पराभव केला. पूर्वार्धातील निसटती आघाडी रेयालने उत्तरार्धात जास्त भक्कम केली. मॅंचेस्टर युनायटेडने 3-0 विजयासह गटात आघाडी घेतली. बायर्न म्युनिकने बेनिफिकाचा 2-0 असा सहज पाडाव केला. ऍजाक्‍सने गटात सुरवातीस आघाडी घेताना एईके अथेन्सला 3-0 नमवले. 

मॅंचेस्टर सिटीची धक्कादायक हार 
मॅंचेस्टर सिटी मार्गदर्शक पेपे गॉर्डिओला यांना टचलाइन बॅनमुळे स्टॅंडमध्ये थांबणे भाग पडले आणि त्यांचा संघ 1-2 पराजित झाला. सिटीला या वेळी सट्टेबाजांनी सर्वाधिक पसंती दिली आहे; पण लिऑनने पूर्वार्धात दोन गोल करीत निकाल स्पष्ट केला. उत्तरार्धात सर्जिओ ऍग्यूएरा बदली म्हणून मैदानात आला; पण त्यामुळे सिटीला पिछाडीच कमी करता आली. 

​ ​

संबंधित बातम्या