सिंधूची साएनाविरुद्ध सरशी; साईनाचा सलामीलाच पराभव 

वृत्तसंस्था
Tuesday, 18 September 2018

चार वर्षांपूर्वी साईनाने ही स्पर्धा जिंकत भारतीय बॅडमिंटनपटू चीनची भिंत सर करू शकतात हे दाखवले होते; पण तिला सलामीला कोरियाच्या सुंग जी ह्युन हिच्याविरुद्ध 22-20, 8-21, 14-21 अशी हार पत्करावी लागली.

चॅंगझोऊ : माजी विजेत्या साईना नेहवालला चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली, तर जागतिक टूर सुपर एक हजार मालिकेच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तिसऱ्या मानांकित पी. व्ही. सिंधूने साएना कावाकामी हिचे आव्हान परतवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. 

चार वर्षांपूर्वी साईनाने ही स्पर्धा जिंकत भारतीय बॅडमिंटनपटू चीनची भिंत सर करू शकतात हे दाखवले होते; पण तिला सलामीला कोरियाच्या सुंग जी ह्युन हिच्याविरुद्ध 22-20, 8-21, 14-21 अशी हार पत्करावी लागली. पहिला गेम जादा गुणांवर जिंकल्यावर साईनाने 6-10 पिछाडीनंतर सलग नऊ गुण दुसऱ्या गेममध्ये, तर तिसऱ्या गेममध्ये 6-9 पिछाडीनंतर सलग पाच गुण गमावले. साईनाने कोरियन प्रतिस्पर्धीविरुद्धच्या गेल्या नऊपैकी आठ लढती जिंकल्या होत्या, त्यामुळे साईनाची हार धक्कादायक आहे. 

सिंधूने जपानच्या साएनाने कावाकामी हिचे आव्हान 26 मिनिटांत 21-15, 21-13 असे परतवले. पहिल्या गेममध्ये 7-7 बरोबरीपर्यंत आघाडी सतत बदलत होती; पण सिंधूने त्याच वेळी सलग सहा गुण जिंकले. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने 6-0 आघाडी 12-11 अशी कमी केली; पण 15-12 आघाडीनंतर सलग पाच गुण जिंकत लढतीचा निर्णयच केला. 
पुरुष दुहेरीत मनू अत्री-बी सुमीत रेड्डीने तैवानच्या जोडीस तीन गेममध्ये पराजित करीत चांगली सुरवात केली आहे. प्रणव जेरी चोप्रा-सिक्की रेड्डीनेही मिश्र दुहेरीत विजयी सलामी दिली आहे. श्रीकांतची एकेरीतील तसेच सत्त्विक साईराजची मिश्र, तसेच पुरुष दुहेरीतील मोहीम उद्यापासून (ता. 19) सुरू होईल.

संबंधित बातम्या