INDvsAUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे घामटे काढणारा संयमाचा महामेरु

सुनंदन लेले
Thursday, 27 December 2018

काही माजी खेळाडूंनी समालोचन करताना त्याच्यावर टिका केली. पळण्याचा वेग कमी असल्याचे कारण देत संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर दडपण आणले. इतकेच काय दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यात वगळण्याचा धक्का त्याला सहन करावा लागला. पण अडचणींना घाबरेल तो चेतेश्वर पुजारा कसला.

मेलबर्न : काही माजी खेळाडूंनी समालोचन करताना त्याच्यावर टिका केली. पळण्याचा वेग कमी असल्याचे कारण देत संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर दडपण आणले. इतकेच काय दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यात वगळण्याचा धक्का त्याला सहन करावा लागला. पण अडचणींना घाबरेल तो चेतेश्वर पुजारा कसला. पुजाराने सगळ्या शंका कुशंकांना तोंडाने बकबक करून नव्हे तर बॅटने धावा करून सडेतोड उत्तर दिले. नॅथन लायनला पुढे सरसावत कडक ऑफ ड्राईव्ह मारून चालू मालिकेतील दुसरे शतक झळकावताना चेतेश्वर पुजाराने दाखवलेला संयम लक्षणीय आहे. 

राजकोटला लहानाचा मोठा झालेल्या चेतेश्वर पुजाराला पहिल्यापासून संयमाची देणगी लाभली. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर सारखे दिग्गज खेळाडू संघात असल्याने चेतेश्वरला भारतीय संघात जागा मिळवायला फार कष्ट करावे लागले. ‘‘प्रथम श्रेणी क्रिकेटमधे शतक केल्यावर कोणी मागे वळून बघत नाही. द्विशतक केले की मग माना वळू लागतात आणि निवड समितीला लक्ष द्यावेच लागते. मी फक्त सातत्याने मोठ्या खेळ्या उभारण्याकडे ध्यान दिले. मग मला संधी देण्यावाचून पर्याय उरला नाही’’, चेतेश्वर एकदा गप्पा मारताना म्हणाला होता. 

बाकी फलंदाजांच्या तुलनेत चेतेश्वर पुजाराची फलंदाजी खूप शैलीदार वाटत नाही त्याबद्दल बोलताना तो म्हणाला होता, ‘‘होय माझी शैली वेगळी आहे. बाकी फलंदाजांच्या तुलनेत ती नजरेस खूप सुखावह नसेल पण मी त्याला काही करू शकत नाही. माझ्या फलंदाजीचा पाया संयमावर आधारलेला आहे. मला प्रदीर्घ काळ खेळपट्टीवर उभे राहून फलंदाजी करायला आवडते. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात खाते उघडायला मला खूप चेंडू खेळावे लागले. त्या खेळी दरम्यानही घाई गडबड करून खाते उघडायचा विचार माझ्या मनाला शिवला नाही. गोलंदाज चांगला मारा करत असले तरी मी थांबतो. त्यांनी चूक करायची शांतपणे वाट बघतो’’, चेतेश्वर म्हणाला होता. 

बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी 280 चेंडूंचा सामना करून पुजाराने दहा चौकारांसह 17वे कसोटी शतक साजरे केले तेव्हा प्रेक्षकांसह आजी माजी खेळाडू उभे राहून टाळ्या वाजवताना दिसले. पुजाराने पहिल्यांदा मयांक आगरवालसोबत केलेली भागीदारी आणि आता विराट कोहली सोबत रचलेली मोठी भागीदारी भारतीय संघाच्या धावफलकाला मजबुती देत आहे. पुजाराच्या शतकी खेळीने मेलबर्न कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी उपहाराला भारतीय संघाने 2 बाद 277 ची मजल मारली होती.

संबंधित बातम्या