बुद्धिबळ ऑलिंपियाड : महिला संघाचे सलामीला धवल यश 

रघुनंदन गोखले 
Tuesday, 25 September 2018

कोनेरू हम्पीने मॉडर्न बचावाने सुरवात केली, पण न्यूझीलंडच्या मिलिगन हिने खूप वेळ भक्कम खेळून हम्पीची डाळ शिजू दिली नाही. हम्पीने राजाच्या बाजूने हल्लाबोल केल्यावर मिलिगन गडबडून गेली. पुणेकर ईशा करवडेने जस्मिन झांग हिला सहज पराभूत केले आणि तेही काळी मोहरे असताना!

बातुनी (जॉर्जिया) : विश्‍वनाथन आनंद, तसेच कोनेरू हम्पीच्या पुनरागमनामुळे बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताची गणना संभाव्य विजेत्यांत होत आहे. त्याचे प्रत्यंतर सलामीच्या फेरीत आले. भारताच्या महिला संघाने सलामीला धवल यश मिळवले, तर पुरुष संघाने सहज विजयासह सुरवात केली. 

पहिल्या फेरीत भारतीय पुरुषांनी एल साल्वाडोरचा धुव्वा उडवला, तर महिलांनी न्यूझीलंडविरुद्ध बाजी मारली. अर्थात प्रतिस्पर्धी संघ फारच दुबळे होते, त्यामुळे भारतीयांचा क्वचितच कस पणास लागला. पाच वेळा जगज्जेता झालेल्या विश्‍वनाथन आनंदने सलामीला सहकाऱ्यांच्या खेळाचा आढावा घेणे पसंत केले, तर महिलांमध्ये कोनेरू हम्पीने तब्बल दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर न्यूझीलंडविरुद्ध पुनरागमन करताना 37 चालींतच विजयाची औपचारिकता पूर्ण केली. 

ताकदवान संघ सलामीला प्रामुख्याने जिंकत असताना स्पर्धेच्या ठिकाणी वेगळेच घडत होते. सुरवातीलाच थेट प्रक्षेपण होत नसल्यामुळे भारतीय रसिक नाराज झाले. केवळ भारतच नव्हे, तर युक्रेन, आर्मेनिया आणि इंग्लंडसारख्या संघांच्या लढतीचे प्रक्षेपण सुरू होत नव्हते. असे काही भारतातील स्पर्धेत घडले असते तर? तर सर्व जगाने किती काहूर माजवले असते? तासाभराने थेट प्रक्षेपण सुरू झाले आणि सर्वच चाहते सुखावले. 

कोनेरू हम्पीने मॉडर्न बचावाने सुरवात केली, पण न्यूझीलंडच्या मिलिगन हिने खूप वेळ भक्कम खेळून हम्पीची डाळ शिजू दिली नाही. हम्पीने राजाच्या बाजूने हल्लाबोल केल्यावर मिलिगन गडबडून गेली. पुणेकर ईशा करवडेने जस्मिन झांग हिला सहज पराभूत केले आणि तेही काळी मोहरे असताना! राष्ट्रीय विजेती पद्मिनी रौत फ्रेंच बचावाविरुद्ध ग्रॅंडमास्टर ताराशने सुचवलेल्या पद्धतीने खेळून आरामात जिंकली. तानिया सचदेवला अनपेक्षितपणे विजयासाठी संघर्ष करावा लागला. पांढरी मोहरे असल्याचा तिला फायदा घेता आला नाही आणि डच बचावाची खेळणाऱ्या पुनसलानविरुद्ध विजय मिळविताना तिला नाकी नऊ आले. 

हरिकृष्णाने तेराव्या चालीतच अश्‍वाच्या मोबदल्यात हत्ती खाऊन आपला विजय निश्‍चित केला. त्याच्या सहकाऱ्यांनाही त्यामुळे हुरूप आला आणि थोड्याच वेळात विदित गुजरातीने साल्वाडोरच्या चावेझला अश्‍वाचाच बळी देण्यास प्रवृत्त केले. नेहमीच आक्रमक खेळणाऱ्या आधिबानला अरियासविरुद्धच्या विजयासाठी फार प्रयास करावे लागले नाहीत, पण शशिकिरण मात्र सुरवातीपासून चाचपडत होता. त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. एकूण पहिल्या फेरीत चांगली सुरवात झाली आणि पुढे काय होते याचे औत्सुक्‍य आहे.

संबंधित बातम्या