शास्त्रींना 'या' खेळाडूंनी दिले आव्हान; कोण होणार प्रशिक्षक?

वृत्तसंस्था
Wednesday, 31 July 2019

प्रशिक्षकांसाठी आलेल्या अर्जाची छाननी करून आता निवड समिती त्यांच्या मुलाखतीचा दिवस निश्‍चित करेल. मुलाखतीचा कार्यक्रम झाल्यावरच प्रशिक्षकाचे नाव अंतिम होईल.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच राहणार, की अन्य कुणाच्या गळ्यात ही माळ पडणार, याचे उत्तर आता प्रशिक्षक निवड समितीच देईल. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत मंगळवारीच संपली असून, ऑस्ट्रेलियाच्या टॉम मूडी यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. कर्णधार विराट कोहली याचे प्रशिक्षक निवडीतील अधिकार काढून घेतले असले, तरी त्याने विंडीज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी शास्त्रींनी प्रशिक्षक राहण्यास काहीच हरकत नाही, असे सांगून नकळत आपला पाठिंबा जाहीर केला होता.

हे खरे असले, तरी शास्त्री यांची निवड सोपी नाही. त्यांना ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी, न्यूझीलंडचे माईक हेसन, श्रीलंकेचे महेला जयवर्धने, भारताच्या रॉबिनसिंग आणि लालचंद राजपूत यांचे आव्हान असेल. त्याचबरोबर फलंदाजी प्रशिक्षकासाठी प्रवीण अमरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षणासाठी जॉंटी ऱ्होड्‌स यांची नावे चर्चेत आहेत. गोलंदाजी प्रशिक्षकासाठी कुणाचेच नाव पुढे आलेले नाही. त्यामुळे भारत अरुण यांच्याकडेच ही जबाबदारी कायम राहण्याची चिन्हे आहेत. 

'बीसीसीआय'च्या क्रिकेट सल्लागर समितीवर या नव्या नियुक्तीची जबाबदारी आहे. या समितीत कपिलदेव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे. 

शास्त्री यांना पसंती 
प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांना अधिक पसंती मिळत आहे. निवड समितीमधील एका सदस्याने काही दिवसांपूर्वीच शास्त्री यांचा खेळाडूंशी समन्वय जुळून आला आहे. खेळाडू त्यांना आणि ते खेळाडूंना चांगले ओळखतात असे सूचक वक्तव्य केले होते. त्याचवेळी कर्णधार विराट कोहलीनेदेखील विंडीज दौऱ्यावर जाता जाता शास्त्रींची पाठराखण केली होती.

शास्त्री यांना पसंती मिळत असली, तरी आता निवड समिती कर्णधाराच्या वक्तव्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही, असे म्हणत आहे. त्याचवेळी खेळाडूंना शिकविण्यापेक्षा खेळाडूंचे व्यवस्थापन करणारा आणि रणनिती आखणारा प्रशिक्षक हवा, असे ही एक विधान समितीमधील एक सदस्य गायकवाड यांनी केले होते. 

प्रशिक्षकांसाठी आलेल्या अर्जाची छाननी करून आता निवड समिती त्यांच्या मुलाखतीचा दिवस निश्‍चित करेल. मुलाखतीचा कार्यक्रम झाल्यावरच प्रशिक्षकाचे नाव अंतिम होईल.


​ ​

संबंधित बातम्या