सिंधू, श्रीकांतसमोर तंदुरुस्तीचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 September 2018

चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेला उद्यापासून (ता. 18) प्रारंभ होत आहे. भरगच्च वेळापत्रकामुळे दमछाक होत असली तरी सातत्य राखण्यासाठी त्यातून सावरत तंदुरुस्ती उंचावण्याचे आव्हान या जोडीसमोर आहे.

चॅंगझोऊ (चीन)- चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेला उद्यापासून (ता. 18) प्रारंभ होत आहे. भरगच्च वेळापत्रकामुळे दमछाक होत असली तरी सातत्य राखण्यासाठी त्यातून सावरत तंदुरुस्ती उंचावण्याचे आव्हान या जोडीसमोर आहे.

गेल्या आठवड्यात जपान ओपनदरम्यान दुसऱ्या फेरीत सिंधूची दमछाक झाल्यासारखे जाणवले. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात डेन्मार्क ओपनमध्ये सिंधू पहिल्या फेरीत हरली होती. त्यानंतर ती इतक्‍या लवकर प्रथमच हरली. यंदा सिंधूने राष्ट्रकुल क्रीडा, जागतिक आणि एशियाड या स्पर्धांत रौप्यपदक मिळविले आहे. सिंधूने 2016 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. सिंधूची त्यामुळे संभाव्य विजेती अशी गणना होत आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) "वर्ल्ड टूर 1000' मालिकेतील ही स्पर्धा आहे. सिंधूची सलामी मंगळवारी जपानच्या साएना कावाकामी हिच्याशी होईल. 

साईना-सिंधू उपांत्यपूर्व लढत? 
निकाल ड्रॉनुसार लागले तर साईना नेहवाल-सिंधू उपांत्यपूर्व लढत होऊ शकते. साईना मंगळवारी कोरियाच्या सुंग जी ह्यूनविरुद्ध खेळेल. साईनाने 2014 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. जागतिक क्रमवारीत सुंग नववी, तर साईना दहावी आहे. आतापर्यंत दहा लढतींत साईनाने आठ विजय मिळविले आहे. त्यानंतर साईनासमोर पाचव्या मानांकित तैवानच्या चेन युफेईचे आव्हान असू शकते. 

श्रीकांतसमोर पुन्हा जगज्जेता? 
श्रीकांतला सातवे मानांकन आहे. त्याने जपानमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याची सलामी डेन्मार्कच्या रॅस्मूस गेम्के याच्याशी आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याची विश्‍वविजेत्या जपानच्या केंटो मोमोटाशी लढत होऊ शकते. मोमोटाकडून तो मलेशिया आणि इंडोनेशियात हरला होता. एच. एस. प्रणॉय याची हॉंगकॉंगच्या एन्जी का लॉंग अँगस याच्याशी लढत होईल.

संबंधित बातम्या