विश्वकरंडक कॅरम स्पर्धेत भारताला 5 सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 September 2018

महिला एकेरी गटात भारताची एस. अपूर्वा विजयी ठरली. तिने अंतिम सामन्यात आपली प्रतिस्पर्धी भारताची काजल कुमारी हिचा २५-५, २५-१४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. उपांत्य सामन्यात काजलने अनुक्रमे आयेशाला २५-९, २५-२१ तर अपूर्वाने रश्मीला २५-१२, १८-२५, २५-३ असे पराभूत केले होते.

चुनचीऑन (दक्षिण कोरीया) : सोंगम स्पोर्ट्स टाऊन येथे २४ ते २८ ऑगस्ट, २०१८ दरम्यान झालेल्या ५ व्या विश्वकरंडक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत भारताच्या प्रशांत मोरेने भारताच्याच कर्णधार रियाझ अकबर अलीला तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत २५-५, १९-२५, २५-१३ असे पराभूत करून विजेतेपद मिळविले.

पहिला सेट प्रशांतने सहज जिंकून सुरुवात छान केली होती. परंतु दुसरा सेट रियाझने जिंकला व सामना बरोबरीत आणला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये प्रशांतने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि विजयश्री खेचून आणत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. रियाझला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य सामन्यात रियाझने श्रीलंकेच्या निसांथा फेर्नांडोला  २५-१२, ५-२५, २५-११ असे  तर प्रशांतने भारताच्या झहीर पाशाला २५-२१, ११-२५, २५-११ असे पराभूत केले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये भारताच्या झहीर पाशाने श्रीलंकेच्या माजी विश्व् विजेत्या निसांथा फेर्नांडोला १७-१६, २५-० अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली व ब्राँझ पदकाची कमाई केली. 

महिला एकेरी गटात भारताची एस. अपूर्वा विजयी ठरली. तिने अंतिम सामन्यात आपली प्रतिस्पर्धी भारताची काजल कुमारी हिचा २५-५, २५-१४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. उपांत्य सामन्यात काजलने अनुक्रमे आयेशाला २५-९, २५-२१ तर अपूर्वाने रश्मीला २५-१२, १८-२५, २५-३ असे पराभूत केले होते. यापूर्वी २०१६ मध्ये यु. के. येथे झालेल्या विश्व् अजिंक्यपद स्पर्धेमध्यही प्रशांत व अपूर्वाने भारताला एकेरी गटात सुवर्ण पदक मिळवून दिले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये भारताच्या आयेशा महम्मदने संघातील सहकारी कर्णधार रश्मी कुमारीला ५-२५, २५-१७, २५-१० असे तीन सेटमध्ये पराभूत करत कांस्य पदक पटकाविले.

पुरुष दुहेरीत अंतिम सामन्यात भारताच्या रियाझ अकबरअलीच्या साथीने प्रशांत मोरे जोडीने भारताच्या झहीर पाशा व सगायभारती जोडीवर १०-२५, २५-४,२५-८ असा विजय मिळविला. त्यामुळे भारताने सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई केली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये श्रीलंकेच्या निसांथा फर्नांडो व चामील कुरे जोडीने त्यांच्या संघातील शाहीद व उदेश जोडीला १६-७, २५-१४ असे पराभूत केले व ब्राँझ पदक पटकाविले.

महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात कर्णधार रश्मी कुमारीच्या व आयेशा महम्मद या भारताच्या जोडीने आपल्या संघातील सहकारी एस. अपूर्वा व काजल कुमारी जोडीवर  २-२५, २५-७, २२-२० अशी मात केली व अनुक्रमे या जोडीने सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये श्रीलंकेच्या रोशिथा व याशिका जोडीने श्रीलंकेच्याच चलानी व मदुका जोडीवर २५-०, १०-६ अशी सहज मात करत ब्राँझ पदक मिळविले. महिला सांघिक गटात भारतीय संघाने श्रीलंकेला ३-० असे सहज पराभूत करून सुवर्ण पदक पटकाविले. भारताच्या विजयात रश्मी कुमारीच्या, एस. अपूर्वा व काजल कुमारीचा महत्वाचा वाटा होता. तिसऱ्या क्रमांकावर कांस्य पदकाची कमाई करताना मालदीवजने जपानच्या संघाला ३-० अशी धूळ चारली.

पुरुष सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा वरचढ ठरला. २०१६ सालच्या विश्व चषकाची पुनरावृत्ती करताना यावेळीही श्रीलंकेने भारतावर २-१ असा निसटता विजय मिळविला. कर्णधार रियाझ अकबरअली आजारी असल्यामुळे सगायभारतीला खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु नवोदित सगायभारती व प्रशांत मोरेच्या पराभवामुळे भारताला सुवर्ण पदकास मुकावे लागले. झहीर पशाचा एकमेव विजय भारताने मिळविला.  सांघिक गटात तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये प्रथमच फ्रान्सच्या संघाने मालदीवज संघावर २-१ असा निसटता विजय मिळवत कांस्य पदकाची कमाई केली. या विजयात फ्रान्सच्या पिअर दुबोस व फ्रान्सिस्को फेर्नांडीसचा महत्वाचा वाटा होता.

तत्पूर्वी या स्पर्धेदरम्यान झालेल्या स्वीस लीग स्पर्धेमध्ये भारताच्या काजल कुमारीने कमाल केली. तिने साखळीतील सातही सामने जिंकले. यात तिने श्रीलंकेचा चामील कुरे, प्रशांत मोरे व रियाझ अकबरअली सारख्या मातब्बर खेळाडूंना मात दिली. केवळ ४० मिनिटांच्या १ सेटचा फटका या खेळाडूंना बसला. काजलने एकंदर १०७ गुणांची कमाई  केली. दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानणाऱ्या श्रीलनेच्या चामील कुरेने ८३ गुण मिळवून दुसरे स्थान पटकाविले. तर सगायभारतीने ७३ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला.

भारताने या स्पर्धेमध्ये ५ सुवर्ण पदके, ५ रौप्य पदके व २ कांस्य पदकांची कमाई केली. यजमान कोरिया व्यतिरिक भारत, श्रीलंका, अमेरिका, मालदीवज, कतार, जपान, पाकिस्तान, पोलंड, झेक रिपब्लिक, फ्रांस, जर्मनी, स्वीत्सेर्लंड, इटली, मलेशिया, सर्बिया, यु. के. अशा एकंदर १७ देशांनी या विश्व् कप स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविला होता. विजेत्यांना आय. सी. एफ. चे अध्यक्ष जोसेफ मेयर, कोरियन कॅरम फेडेरेशनचे अध्यक्ष दोहून बे, आदी मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांचे दिल्ली विमानतळावर कॅरम रसिकांनी जंगी स्वागत केले.


​ ​

संबंधित बातम्या