सिंधूप्रमाणे माझ्यावर मायदेशात दडपण नाही: मरिन

वृत्तसंस्था
Thursday, 20 December 2018

बॅडमिंटनमध्ये अनेक नवीन नियम आले. त्यातील सर्व्हिसवर असलेला नियम म्हणजे मूर्खपणाचाच आहे. त्यात उंच खेळाडूंचा विचारच केलेला नाही. आता त्याबद्दल काही बोलणेही चुकीचे आहे.
- कॅरोलिन मरिन

मुंबई : सिंधू माझी कोर्टवरही चांगली मैत्रीण आहे. तिच्याप्रमाणे माझ्याकडून देशवासीयांच्या मोठ्या अपेक्षा नसतात. त्यामुळे त्या पूर्ण करण्याचे माझ्यावर दडपण नसते, असे प्रतिपादन ऑलिंपिक विजेत्या कॅरोलिन मरिन हिने व्यक्त केले. पुणे एसेस या प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील संघाच्या जर्सी अनावरण कार्यक्रमानंतर मरिनने हे मत व्यक्त केले.

सिंधू-मरिन लढतीने प्रीमियर बॅडमिंटन लीगला सुरुवात होणार आहे. आमच्या दोघींत चांगली स्पर्धा आहे, तसेच आमची कोर्टवरही चांगली मैत्री आहे, असे मरिनने सांगितले. सिंधूवर भारतात अपेक्षांचे दडपण असते. मरिनविरुद्ध सतत पराजित होत असल्याबद्दल टीकाही होते. याकडे लक्ष वेधल्यावर माझ्या स्पेन देशात मला या प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागत नाही. मी सिंधूविरुद्ध हरले तर तो खेळाचाच भाग समजला जातो. मला चांगल्या कामगिरीसाठी कायम प्रोत्साहित केले जाते, असे मरिनने सांगितले. 

प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या निमित्ताने मला ऑलिंपिक पात्रता वर्षापूर्वी चांगल्या खेळाडूंविरुद्ध खेळायला मिळणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत सहकारी खेळाडूंच्या लढतीच्यावेळीही दडपण असते. तीसद्धा एक चांगली पूर्वतयारी असते, असे मरिनने सांगितले. 

बॅडमिंटनमध्ये अनेक नवीन नियम आले. त्यातील सर्व्हिसवर असलेला नियम म्हणजे मूर्खपणाचाच आहे. त्यात उंच खेळाडूंचा विचारच केलेला नाही. आता त्याबद्दल काही बोलणेही चुकीचे आहे.
- कॅरोलिन मरिन

दुहेरीची जोडी म्हणजे एकप्रकारे दाम्पत्यच
दुहेरीची लढत खेळताना कोर्टवर चांगले सामंजस्य राहण्यासाठी कोर्टबाहेरही तुमची चांगली मैत्री हवी. किंबहुना ही जोडी हे एक प्रकारचे दाम्पत्यच असते, असे भारताचा आघाडीचा दुहेरीतील खेळाडू चिराग शेट्टी याने सांगितले. तो आणि सात्विक साईराज यांची जोडी गेल्या काही वर्षांपासून जागतिक बॅडमिंटनमध्ये लक्षणीय यश मिळवत आहे. ऑलिंपिक वर्षात पहिल्या दहात कायम राहण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे चिरागने सांगितले. दुहेरीतील यशाबद्दल बोलताना तो म्हणाला, सात्विक हा भारतीय खाण्याचा चाहता आहे, त्यामुळे स्पर्धा सुरू असताना आम्ही किमान एक तरी भारतीय जेवण घेतो. त्यावेळी माझ्या आवडीस मुरड घालतो, तर टीव्ही पाहताना तो त्याच्या आवडींना मुरड घालतो, असे त्याने सांगितले. 


​ ​

संबंधित बातम्या