CPL2020 लो स्कोरिंग मॅच! सेंट लुसिया अवघ्या 92 धावा करुन जिंकणारा 'बाजीगर' संघ

सुशांत जाधव
Sunday, 30 August 2020

अल्पशा धावसंखेचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर बारबाडोस ट्रिडेंट्सचा संघ सामना सहज खिशात घालेल असे वाटले होते. पण..

कॅरेबियन प्रीमियर लीगमधील 19 व्या सामना गोलंदाजांनी गाजवल्याचे पाहायला मिळाले. बारबाडोस ट्रिडेंट्स विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सेंट लुसिया झुक्सने  धावफलकावर 92 धावा लावून सामना जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला. सेंट लुसिया झुक्सची सुरुवातच खराब झाली. क्रिकेटच्या मैदानातील धडधाकड गडी रहकिम कॉर्नवाल अवघ्या 6 धावा करुन तंबूत परतला. त्याच्यापाठोपाठ दुसऱ्या बाजूला खेळणारा आंद्रे फ्र्लेंचरही तेवढ्याच धावा (6) करुन माघारी फिरला. निजिबुल्लाह 22, लेनिको बाऊचर 18 आणि रोस्टन चेस 14 धावा वगळता एकालाही दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. परिणामी सेंट लुसियाचा संघ 18 षटकात 92 धावांतच आटोपला. 

कोरोनाच्या धास्तीमुळेच रैनाने घेतली IPL स्पर्धेतून माघार

अल्पशा धावसंखेचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर बारबाडोस ट्रिडेंट्सचा संघ सामना सहज खिशात घालेल असे वाटले होते. पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते याचा नमुना दुसऱ्या डावाला सुरुवात झाल्यानंतर अनुभवायला मिळाला. सलामीवीर जॉन्सन कार्लेस 39 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र दुसऱ्या बाजूला कॅरेबियन लीगमधील स्टार खेळाडू शाय होप अवघ्या 14 धावा करुन माघारी फिरल्यानंतर त्याला अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही.

CPL 2020: पोलार्डची 9 गगनचुंबी षटकारांची बरसात -VIDEO

कोरे अँड्रसन 11 आणि अश्ले नर्स 12 यांच्याशिवाय एकही गडी दोन अंकी धावसंख्येपर्यंत पोहचला नाही. परिणामी सहज सोपे वाटणारे लक्ष्य बारबाडोस ट्रिडेंट्ससाठी डोंगराऐवढे झाले. अखेरच्या षटकात 6 चेंडूत 9 धावांची आवश्यकता असताना  सेंट लुसियाच्या कर्णधाराने चेंडू रोस्टन चेसच्या हाती सोपवला.  बारबाडोस ट्रिडेंट्सच्या हातात 4 गडी असल्यामुळे सामना तसा त्यांच्या हातात होता. पण चेसने त्यांना चेस करु दिले नाही. एका विकेटसह पाच धावा खर्च करत त्याने सामना सेंट लुसिया झुक्सच्या पारड्यात टाकला. 


​ ​

संबंधित बातम्या