ट्वेंटी20 खेळल्यावरही माझी शैली बदलली नसती : लारा 

वृत्तसंस्था
Friday, 7 September 2018

क्रिकेट विश्‍वातील वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने सध्या प्रचंड लोकप्रिय होत असलेले टी- 20 क्रिकेट माझ्या कालावधीत असते, तर मी सहज खेळू शकलो असतो; पण त्याचा माझ्या कसोटी क्षमतेवर किंवा नैसर्गिक शैलीवर परिणाम झाला नसता, असे मत व्यक्त केले आहे.

न्यूयॉर्क : क्रिकेट विश्‍वातील वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने सध्या प्रचंड लोकप्रिय होत असलेले टी- 20 क्रिकेट माझ्या कालावधीत असते, तर मी सहज खेळू शकलो असतो; पण त्याचा माझ्या कसोटी क्षमतेवर किंवा नैसर्गिक शैलीवर परिणाम झाला नसता, असे मत व्यक्त केले आहे. 

लारा म्हणाला, "दुसरा कसोटी सामना खेळण्यापूर्वी मी पंचवीस एक एकदिवसीय सामने खेळलो असेन. त्यामुळे माझ्यातील आक्रमकतेला खतपाणीच मिळाले. त्यामुळेच माझ्या कारकिर्दीत टी-20 हे एकदिवसीय क्रिकेटपेक्षा अधिक आक्रमक क्रिकेट असते, तर तेदेखील मी सहज खेळलो असतो आणि विशेष म्हणजे त्याचा माझ्या शैलीवर कुठेही परिणाम झाला नसता.'' 

ऑलिंपिक समावेश व्हावा 

टी-20 क्रिकेटने प्रभावित झालेल्या लाराने क्रिकेटच्या ऑलिंपिक समावेशाची इच्छाही व्यक्त केली. तो म्हणाला, "टी-20 क्रिकेट केवळ तीन तासांचे आहे. मग, या स्वरूपाच्या क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये का समावेश होऊ शकत नाही, हेच कळत नाही. गोल्फला ही संधी पुन्हा मिळाली. आता वेळ क्रिकेटची आहे.'' 
यासाठी आयसीसीने पावले उचलण्याची गरज आहे. ऑलिंपिक समावेशासाठी टी-20 क्रिकेट योग्य आहे ही भावना आधी त्यांना पटायला हवी. टी-20 क्रिकेटला सुरवात झाल्यापासून अनेक देश क्रिकेटकडे आकर्षित व्हायला लागले आहेत. ही क्रिकेटची प्रगती आहे हे आयसीसीने लक्षात घ्यावे, असे सांगून लारा म्हणाला, "एकदिवसीय विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा अजूनही 10 संघांतच होते. पण, टी-20 क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेत 16 देश खेळतात. यावरून क्रिकेटकडे आकर्षित होणाऱ्या देशांचा कल कशाकडे आहे हे लगेच लक्षात येते.'' 

''क्रिकेट कारकिर्दीत नेहमीच शेन वॉर्न हा खेळण्यास कठीण गोलंदाज वाटला. क्रिकेट विश्‍वातील तो महान लेगस्पीन गोलंदाज आहे. आज जरी कोण महान फिरकी गोलंदाज असे विचारल्यास मी वॉर्नचेच नाव घेईन.'' 
- ब्रायन लारा, वेस्ट इंडीजचा महान फलंदाज 


​ ​

संबंधित बातम्या