"रेड डेव्हिल्स'चा ब्राझीलला "रेड सिग्नल'

वृत्तसंस्था
Monday, 9 July 2018

पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलची विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील मोहीम उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमविरुद्ध खंडित झाली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतलेल्या, "रेड डेव्हिल्स' हे बिरुद लाभलेल्या बेल्जियमने क्रमवारीत दुसऱ्या, ऐतिहासिक कामगिरीत परमोच्च, तर उर्वरित संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीत सर्वोच्च स्थानी राहिलेल्या ब्राझीलला "रेड सिग्नल' दाखविला. 
 

कझान- पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलची विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील मोहीम उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमविरुद्ध खंडित झाली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतलेल्या, "रेड डेव्हिल्स' हे बिरुद लाभलेल्या बेल्जियमने क्रमवारीत दुसऱ्या, ऐतिहासिक कामगिरीत परमोच्च, तर उर्वरित संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीत सर्वोच्च स्थानी राहिलेल्या ब्राझीलला "रेड सिग्नल' दाखविला. 

फर्नांडीनोकडून झालेल्या स्वयंगोलच्या धक्‍क्‍यानंतर केव्हिन डी ब्रुईन याच्या सनसनाटी गोलने ब्राझीलच्या तोंडचे पाणी पळविले होते. नेसर चॅडलीने कॉर्नर धूर्तपणे घेताना गोलपोस्टच्या जवळ चेंडू मारला. त्या वेळी फर्नांडीनोने हेडिंगवर बचावाचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या दंडाला लागून नेटमध्ये गेला. लढतीच्या प्रारंभापासून चालींचा धडाका लावलेले ब्राझीलचे खेळाडू नेटसमोर मात्र "रिलॅक्‍स' होऊन खेळले नाही. त्यामुळे नेमारपासून थियागो सिल्वा यांचे काही फटके स्वैर गेले. बेल्जियमचा गोलरक्षक थिबौट कॉर्टोईस याने चपळ कामगिरीच्या जोरावर ब्राझीलला हताश केले. बदली खेळाडू रेनॅटो आगुस्टो याने हेडिंगवर खाते उघडल्यानंतर ब्राझीलला 14 मिनिटे मिळाली होती, पण सामना अतिरिक्त वेळेत घालविण्याच्या त्यांच्या आशा आणि पर्यायाने आव्हानही संपुष्टात आले. खरे तर कझान एरिनावर ब्राझीलला जास्त पसंती होती. अंतिम टप्प्यात ब्राझीलने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण रॉबर्टो फर्मिनो, आगुस्टो आणि कुटिनो यांचे प्रयत्न थोडक्‍यात हुकले. 

लुकाकूची जोरदार चाल 
बेल्जियमने केलेला दुसरा गोल हा निकाल सार्थ असल्याचे दाखवितो. खाते उघडण्यात त्यांना स्वयंगोलची साथ मिळाली होती. दुसरा गोल मात्र प्रतिआक्रमणाचे आदर्श उदाहरण ठरला. लुकाकूने नेटकडे पाठ असताना चेंडूवर ताबा मिळविला. मग संतुलन साधत त्याने वळून वेगवान धाव सुरू केली. फर्नांडीनोला चकवीत त्याने जोरदार चाल रचत डी ब्रुईनला पास दिला. डी ब्रुईनने बॉक्‍सपाशी अचूक फटका मारत ही चाल यशस्वी ठरविली. 

डी ब्रुईनची मुसंडी 
"सामनावीर' ठरलेल्या डी ब्रुईन याने आधीच्या चार लढतींच्या तुलनेत मुसंडी मारत खेळ केला. बचाव फळी ते आक्रमण असे स्थित्यंतर त्याने दूरदृष्टी, वेग आणि अचूकतेच्या जोरावर यशस्वी ठरविले. 


​ ​

संबंधित बातम्या