आता टेनिसपटू सानियाच्या कारकिर्दीवरही निघणार चित्रपट

वृत्तसंस्था
Saturday, 9 February 2019

वेगवेगळ्या भूमिका समरस होऊन वेगाने पार पाडते आहे. मी काही काळ पत्नी होते. नुकतीच मी आई झाले. आता मी सर्वोच्च पातळीवर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. हे सोपे नसल्याची मला कल्पना आहे, पण हे करण्यापेक्षा इतर काहीही महत्त्वाचे नाही.
- सानिया मिर्झा

नवी दिल्ली : चॅंपियन खेळाडूंच्या कारकिर्दीवरील चित्रपटांच्या मालिकेत आणखी एक भर पडणार आहे. दुहेरीत अव्वल स्थानापर्यंत मजल मारलेल्या सानिया मिर्झा हिच्यावरील चित्रपट आता प्राथमिक अवस्थेत आहे. स्वतः सानियाने ही माहिती दिली. बॉलिवूड चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला हा चित्रपट बनविणार आहेत.

सानियाने सांगितले की, याविषयी काही काळापासून चर्चा सुरू होती. आता मी करारावर स्वाक्षरी केली आहे. प्राथमिक काम यापूर्वीच सुरू झाले आहे. ही फार विलक्षण गोष्ट आहे. आम्ही आतुर आहोत. एकमेकांच्या सहमतीने ही निर्मिती होईल. यात माझी माहिती अर्थातच महत्त्वाची असेल, कारण ही माझी कथा आहे. त्यामुळे मला हे करावे लागेल. आजच आम्ही याची घोषणा केली आहे. हळूहळू दिग्दर्शन, पटकथा, कलाकारांची निवड असे टप्पे येतील. अजून बरीच मजल मारायची आहे.

सानिया आता 32 वर्षांची आहे. "एस अगेन्स्ट ऑड्‌स' या नावाने तिचे आत्मचरित्र 2016 मध्ये प्रकाशित झाले. याबद्दल ती म्हणाली की, "मी पुस्तक इतक्‍या लवकर का लिहिले असे विचारणारे मी किती वर्षे खेळत आहे हे विसरतात. मला पाहून लोकांना वाटते की मी आता चाळीस वर्षांची झाले आहे. मी फार लहान असताना टेनिसमध्ये प्रवेश केला. मी प्रसार माध्यमांच्या साक्षीने साऱ्या जगासमोर लहानाची मोठी झाले. 29 व्या वर्षी पुस्तक लिहिण्यात आणि इतके काही साध्य करण्यात मी फार भाग्यवान ठरले आहे.'

यंदा मोसमाच्या अंतिम टप्प्यात पुनरागमन करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचेही सानियाने सांगितले.

वेगवेगळ्या भूमिका समरस होऊन वेगाने पार पाडते आहे. मी काही काळ पत्नी होते. नुकतीच मी आई झाले. आता मी सर्वोच्च पातळीवर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. हे सोपे नसल्याची मला कल्पना आहे, पण हे करण्यापेक्षा इतर काहीही महत्त्वाचे नाही.
- सानिया मिर्झा

संबंधित बातम्या