Happy Birthday Yuvraj Singh : भारताचा 'जिगरबाज मॅच विनर' झाला 38 वर्षांचा!

वृत्तसंस्था
Thursday, 12 December 2019

भारताचा आतापर्यंतचा जिगरबाज 'मॅच विनर' कोण' या प्रश्‍नाचं उत्तर सोपं आहे.. युवराजसिंग! धडाकेबाज फलंदाज ते उपयुक्त अष्टपैलू हा युवराजचा प्रवास भारतीय क्रिकेट संघाच्या गेल्या 19 वर्षांमधील वाटचालीचा मोठा भाग आहे.

भारताचा आतापर्यंतचा जिगरबाज 'मॅच विनर' कोण' या प्रश्‍नाचं उत्तर सोपं आहे.. युवराजसिंग! धडाकेबाज फलंदाज ते उपयुक्त अष्टपैलू हा युवराजचा प्रवास भारतीय क्रिकेट संघाच्या गेल्या 19 वर्षांमधील वाटचालीचा मोठा भाग आहे. खालावलेली कामगिरी आणि तरुण खेळाडूंच्या उदयामुळे युवराजसिंग मागे पडला अन् त्याने निवृत्ती घोषित केलेली असली तरीही आजवरच्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात आजही युवराजचे स्थान अढळ आहे.

युवराजच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याच्या आजी-माजी सहकाऱ्यांकडून आणि सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींकडून त्याला मिळणाऱ्या शुभेच्छा हे त्याच प्रेमाचे द्योतक आहे. 2000 मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून युवराजचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण झाले. पहिल्याच मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियाला तडाखा दिला. त्यानंतर इंग्लंडमध्ये नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात महंमद कैफला साथीला घेत त्याने भारताला विजयाच्या मार्गावर नेले. तेव्हापासून भारतीय संघ युवराजकडे 'फिनिशर' म्हणून पाहू लागला. 

पदार्पणानंतर सात वर्षांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताने अजिंक्‍यपद पटकाविले. यात युवराजचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर चारच वर्षांनी मायदेशामध्ये भारताने विश्‍वकरंडक जिंकला, त्यातही युवराजच्या अष्टपैलू खेळाचा वाटा होता.

त्याच विश्‍वकरंडक स्पर्धेदरम्यान युवराजला आरोग्याच्या आघाडीवरही लढाई लढावी लागली. त्यातून पूर्ण सावरून तो पुन्हा मैदानात उतरला खरा; पण 'त्या' युवराजला साजेशी कामगिरी त्याला पुन्हा करता आली नाही. त्यामुळे यथावकाश युवराजला भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले. त्याने मुकतेच परदेशातील लीग खेळण्यासाठी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

 युवराजच्या वाढदिवसानिमित्त ट्‌विटरवर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या.


​ ​

संबंधित बातम्या