चढायांच्या तुफानातील लढत बरोबरीत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 September 2019

-पवन आणि नविनच्या सुपर टेन कामगिरीने सामना पूर्णपणे चढायांवरच रंगला

-यंदाच्या माेसमात दिल्ली संघ आघाडी टिकवून असून, ते केवळ दाेन सामने हरले आहेत.

-हरियाना संघाने धर्मराजच्या गैरहजेरीतही विजय खेचून आणत तिसरे स्थान पटकावले

-प्रदीपची सुपर टेन कामगिरी पुन्हा पाटणासाठी अपुरी पडली.

-विकास कंडाेलामुळे मात्र हरियानाचा विकास झाला

जयपूर - नविन कुमार आणि पवन कुमार या दोघांच्या चढायामधील तुफानात प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात सोमवारी बंगळूर बुल्स आणि दबंग दिल्ली ही लढत 39-39 अशी बरोबरीत राहिली. 
नविनच्या वेगवान चढायांनी पूर्वार्धात दिल्लीची दबंगगिरी कायम राहिली होती. त्याला रवी पहलची साथ मिळाली. त्यामुळे बंगळूरच्या पवन कुमारची कोंडी झाली. सहाजिकच पवनचे अपयश आणि रोहित कुमारची अनुपस्थिती यामुळे विश्रांतीला बंगळूर 19-22 असे पिछाडीवर राहिले. 
उत्तरार्धात फारशी वेगळी परिस्थिती राहिली नाही. पवनला बाहेरच ठेवत दिल्लीने बंगळूरवर दुसरा लोण देत 33-23 अशी आघाडी मिळविली. पण, हा लोणच त्यांच्यासाठी घातक ठरला. पवनचे याच गुणस्थितीतून तुफान असे काही अवतरले की दिल्लीचा बचाव कोलमडून पडला. अवघ्या पाच मिनिटांत एकट्या पवनने दिल्लीवर लोण लादला आणि गुणस्थिती 35-33 अशी आवाक्‍यात आणली. त्यानंतरही पवनला रोखण्यात दिल्लीला अपयश आले आणि 36-36 अशा बरोबरीवर सामना आला. तेथून पुन्हा एकदा नविनने दिल्लीला हात दिला आणि 39-36 अशी आघाडी मिळवून दिली. पण, अखेरच्या एका मिनिटातील चढाई करण्यामध्ये दोन्ही संघांकडून झालेली घाईच सामना बराबेरीत सुटण्यास कारणीभूत ठरली. बंगळूरने एका मिनिटांत तीन गुण घेत सामना बरोबरीत सोडवला. 
हरियानाचा "विकास' 
त्यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात हरियाना स्टिलर्ससाठी पुन्हा एकदा विकास कंडोलाच्या चढाया निर्णायक ठरल्या. या वेळी त्याला प्रशांत कुमार रायची साथ मिळाली आणि त्यामुळे हरियाना स्टिलर्सला यंदाच्या मोसमातील आपला "विकास' साधता आला. त्यांनी प्रदीप नरवालच्या "सुपर टेन' नंतरही पाटणा पायरेट्‌सचे आव्हान 39-34 असे परतवून लावले. विकास कंडोलाच्या 13 गुणांना प्रशातच्या 8 गुणांची साथ मिळाली. कर्णधार धर्मराज चेर्लाथनला विश्रांती देऊनही हरियाना संघाने हा विजय साकार केला. पाटणा संघाकडून प्रदीपने 17 गुणांची कमाई केली. जान कुन लीने त्याला सात गुणांची साथ केली. पण, त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. संपूर्ण सामन्यात त्यांना स्विकारावे लागलेले तीन लोण त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरले. 


​ ​

संबंधित बातम्या