आयसीसी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत बेन स्टोक्सची मुसंडी ; तर 'हे' भारतीय पहिल्या 5 मध्ये

टीम ई-सकाळ
Tuesday, 21 July 2020

कोरोनाच्या संकटानंतर सुरु झालेल्या इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात महत्वाची खेळी करणाऱ्या इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

कोरोनाच्या संकटानंतर सुरु झालेल्या इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात महत्वाची खेळी करणाऱ्या इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे याच कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात उत्कृष्ठ खेळी करत प्रथम क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डरची दुसऱ्या नंबरवर घसरण झाली आहे. शिवाय आयसीसीच्या फलंदाजीच्या क्रमवारीत देखील बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. 

 

मँचेस्टर येथील इंग्लंड-विंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सने फलंदाजी करताना (176) धावा आणि दुसऱ्या डावात (78) धावा केल्या होत्या. याशिवाय दोन्ही डावात मिळून गोलंदाजी करताना बेन स्टोक्सने 3 विकेट घेतल्या. तसेच या मालिकेच्या पहिल्या साउथहॅम्प्टनच्या सामन्यात बेन स्टोक्सने पहिल्या डावात (43) आणि दुसऱ्या डावात (46) धावा बनवल्या होत्या. तर दोन्ही डावात मिळून 6 बळी बेन स्टोक्सने घेतले होते. त्यामुळे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत, बेन स्टोक्स अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर व फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आला आहे. याव्यतिरिक्त पहिल्या सामन्यात वगळलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने मँचेस्टर येथील सामन्यात दोन्ही डावात मिळून 6 विकेट घेतल्या. त्यामुळे गोलंदाजीच्या क्रमवारीत स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्या दहा खेळाडूंमध्ये मजल मारत दहावे स्थान प्राप्त केले आहे.    

ENGvsWI : दुसरा कसोटी सामना जिंकत इंग्लंडची मालिकेत बरोबरी     

याशिवाय आयसीसीने आज जाहीर केलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचे रविंद्र जडेजा व आर अश्विन यांनी अनुक्रमे तिसरे व पाचवे स्थान राखले आहे. रविंद्र जडेजा 397 अंकांसह तिसऱ्या स्थानावर आणि आर अश्विन 281 अंकांसह पाचव्या स्थानावर आहेत.

दरम्यान, इंग्लंड-विंडीज यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सलामीवीर बेन स्टोक्स आणि डॉम सिब्ले यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 9 गड्यांच्या बदल्यात 469 धावांवर मजल मारली आणि डाव घोषित केला होता. यानंतर फलंदाजी साठी आलेल्या पाहुण्या विंडीजच्या संघाला 287 धावांवर रोखत इंग्लंडने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. व दुसऱ्या डावात 129 धावा करत इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाला 312 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पूर्ण करता न आल्यामुळे इंग्लंड-विंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना इंग्लंडने जिंकला. त्यामुळे तीन कसोटी मालिकेमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाशी 1 - 1 ने बरोबरी साधली आहे.        
 


​ ​

संबंधित बातम्या