Ashes 2019 : बेन स्टोक्‍सच्या संयमी शतकामुळे इंग्लंडचा रोमहर्षक विजय

वृत्तसंस्था
Sunday, 25 August 2019

पहिल्या डावात 67 धावांत गारद होण्याची वेळ आल्यानंतरही इंग्लंडने दुसऱ्या डावात 359 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 9 बाद 362 धावा करून विजय मिळविला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 

ऍशेस मालिका : लीडस्‌ : विश्‍वकरंडक अजिंक्‍यपदाच्या लढतीत इंग्लंडचा पराभव टाळण्यात मौल्यवान खेळी करणारा बेन स्टोक्‍स आता कसोटी क्रिकेट सामन्यातही इंग्लंडचा तारणहार ठरला. धीरोदात्त नाबाद 135 शतकी खेळी करून त्याने इंग्लंडला ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एक गडी राखून विजय मिळवून दिला.

पहिल्या डावात 67 धावांत गारद होण्याची वेळ आल्यानंतरही इंग्लंडने दुसऱ्या डावात 359 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 9 बाद 362 धावा करून विजय मिळविला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 

इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य होते. चौथ्या दिवशी 3 बाद 156 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरवात केल्यावर त्यांची सुरवात वाईट झाली. कर्णधार ज्यो रुट वैयक्तिक धावसंख्येत दोन धावांची भर घालून 77 धावांवर बाद झाला. त्यानंतर 70 चेंडूत अवघ्या दोन धावा अशी कमालीची संयमी सुरूवात करणाऱ्या स्टोक्‍सने प्रथम बेअरस्टॉच्या साथीत पाचव्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. ही जोडी जमली असे वाटत असताना बेअरस्टॉ (36) बाद झाला.

त्यानंतर बटलर, ख्रिस वोक्‍स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला विजय दिसू लागला. त्यावेळी इंग्लंडची अवस्था 9 बाद 286 अशी होती. त्यांना विजयासाठी अजून 73 धावांची आवश्‍यकता होती. अशा कठिण परिस्थितीत स्टोक्‍सने आक्रमकतेला बचावाची ढाल बनवून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. जॅक लिचने त्याला कमालीची संयमी साथ दिली. सतरा चेंडूनंतर त्याने पहिली धाव काढली. तोवर स्टोक्‍सने कारकिर्दीतले आठवे शतक साजरे केले आणि खराब चेंडूंवर घाव घालत कमिन्सचा चौकार ठोकून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. लिचच्या साथीत त्याने अखेरच्या विकेटसाठी 76 धावांची नाबाद भागीदारी केली. 

संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया 179 आणि 246 पराभूत वि. इंग्लंड 67 आणि 9 बाद 362 (बेन स्टोक्‍स नाबाद 135 -219 चेंडू, 330 मिनिटे, 11 चौकार, 8 षटकार, ज्यो रुट 77, ज्यो डिन्ले 50, जॉनी बेअरस्टॉ 36, जोश हेझलवूड 4-85, नॅथन लायन 2-114)


​ ​

संबंधित बातम्या