आयपीएल वरून बीसीसीआय-पीसीबी आमने सामने 

टीम ई-सकाळ
Thursday, 25 June 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलचे आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान घेण्याचे प्रयत्न सुरु केले होते. आणि अशातच  पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) यंदाची आशिया चषक टी-२० स्पर्धा वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार असल्याचे म्हटल्याने, बीसीसीआय समोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आयोजनाचा निर्णय, ऑस्ट्रेलिया मध्ये रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या निश्चितीनंतरच घेण्यात येणार आहे. यंदा आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सध्याच्या कोरोना स्थितीमध्ये या स्पर्धेवर रद्द होण्याची टांगती तलवार लटकत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलचे आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान घेण्याचे प्रयत्न सुरु केले होते. आणि अशातच पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) यंदाची आशिया चषक टी-२० स्पर्धा वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार असल्याचे म्हटल्याने, बीसीसीआय समोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.

 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेली यंदाची आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आल्यास, त्याठिकाणी बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. पण आता यंदाची आशिया चषक टी-२० स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार असल्याचे पाकिस्तानच्या  क्रिकेट बोर्डाने म्हटले होते. त्यावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी बोलताना, भारताला सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये आशिया चषक स्पर्धेत भाग घेता येणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच यंदा आशिया चषकाच्या आयोजनावर साशंकता व्यक्त करताना, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी नोव्हेंबर नंतर आशिया चषक स्पर्धा घेतल्यास योग्य ठरणार असल्याचे म्हणत, मात्र त्यासाठी पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांना पुढे ढकलावे लागणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.       

दरम्यान, यंदाच्या आशिया चषक टी-२० स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे कोणत्याही स्थानिक स्पर्धेसाठी आशिया चषक स्पर्धा रद्द करण्यास आपली परवानगी नसल्याचे पाकिस्तानच्या बोर्डाने म्हणत, यंदाची आशिया चषक स्पर्धा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये श्रीलंका अथवा यूएई या देशांमध्ये घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे म्हटले होते. तसेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या संघातील दहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यासह आगामी मालिकांवर सध्या तरी प्रशचिन्ह निर्माण झाले आहे. याव्यतिरिक्त, आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला सुमारे ४ हजार कोटींचे नुकसान होऊ शकते. तर आयपीएलच्या संघ मालकांना देखील मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचे, जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहे.    

 

 


​ ​

संबंधित बातम्या