आयपीएल 2020 च्या टायटल प्रायोजकत्व करारास बीसीसीआय आणि विवोने दिली स्थगिती  

टीम ई-सकाळ
Thursday, 6 August 2020

बीसीसीआयला आगामी आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी नवा स्पॉन्सर शोधावा लागणार आहे.   

विवो या चीनमधील कंपनीस आयपीएलचे पुरस्कर्ते म्हणून कायम ठेवल्यामुळे सर्वच माध्यमातून टीका सुरु झाली होती. यामुळे मंगळवारी 5 ऑगस्टला विवो कंपनीने स्पॉन्सरशिपसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत, बीसीसीआयसोबतच्या आयपीएल मधील करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता बीसीसीआय आणि विवो यांनी आज यंदाच्या 2020 साठीच्या आयपीएल हंगामाच्या टायटल प्रायोजकत्व करारास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीसीसीआयला आगामी आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी नवा स्पॉन्सर शोधावा लागणार आहे.   

इंग्लंड व भारतास त्यांचाच मायभूमीत हरवणे माझे स्वप्न - स्टीव्ह स्मिथ 

भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावरून सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, चिनी कंपन्यांच्या विरोधात देशात संतापाचे वातावरण आहे. मात्र  विवोबरोबरील करार बीसीसीआयने एकतर्फी रद्द केला असता तर भारतीय मंडळास याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता होती. भारतीय क्रिकेट मंडळ पुरस्कर्त्यांबरोबरील प्रत्येक कराराच्यावेळी बँक हमी घेत असते. विवो आणि आयपीएल यांच्यातील करारानुसार ज्याच्याकडून करार रद्द होईल, त्यास मोठा आर्थिक फटका बसणार असल्यामुळे दोघांनीही थेट प्रस्ताव मांडला नव्हता. परंतु 5 ऑगस्ट रोजी विवोनेच या करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बीसीसीआयला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार नाही. त्यानंतर आज बीसीसीआय आणि विवो यांनी यंदाच्या आयपीएल टायटल प्रयोजकत्वास स्थगित दिली आहे.           

कोरोनामुळे आता माद्रिद टेनिस ओपन स्पर्धा रद्द 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विवोने आयपीएलचे पुरस्कर्ते म्हणून माघार घेण्याचे संकेत दिले होते. विवो आयपीएलचे पुरस्कर्ते राहिल्यास त्यामुळे नकारात्मक परिणाम होतील. त्याचबरोबर कोरोना आक्रमणामुळे प्रलंबित झालेल्या आयपीएलच्या तारखांबाबत अंतिम निर्णय होत नसल्यानेही विवो नाराज होते. त्या मुद्द्यावरुन करार रद्द करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र त्यावेळी भारतीय मंडळाने त्यांचे मन वळवले होते. तसेच यापूर्वी, अखिल भारतीय व्यापारी संघटनेने विवो आयपीएलचे पुरस्कर्ते असल्यामुळे या लीगला परवानगी देऊ नये अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांना केली होती. विवो हे आयपीएलचे पुरस्कर्ते असल्यामुळे भारतीय मंडळास ही लीग भारतात तसेच परदेशात घेण्यास विरोध करण्याची विनंती त्यांनी केली होती. विवोबरोबरच पेटीएम, अलीबाबा, ड्रीम इलेव्हन, स्विगी या चीनशी संबंधित कंपन्या आयपीएलच्या सहपुरस्कर्ते आहेत.
 


​ ​

संबंधित बातम्या