अखेर बायर्न म्युनिकचा विजय

वृत्तसंस्था
Monday, 3 December 2018

बायर्न म्युनिकने अखेर बुंडेस्लिगामधील महिनाभरातील पहिला विजय मिळवला. या विजयामुळे बायर्न तिसऱ्या क्रमांकावर गेले, पण अजूनही आघाडीवरील बोरुसिया डॉर्टमंड आणि बायर्न यांच्यात 9 गुणांचा फरक आहे. 

 म्युनिक : बायर्न म्युनिकने अखेर बुंडेस्लिगामधील महिनाभरातील पहिला विजय मिळवला. या विजयामुळे बायर्न तिसऱ्या क्रमांकावर गेले, पण अजूनही आघाडीवरील बोरुसिया डॉर्टमंड आणि बायर्न यांच्यात 9 गुणांचा फरक आहे. 

सर्गे घॅब्री याच्या दोन गोलमुळे बायर्नने वेर्डर ब्रेमेनचा 2-1 पाडाव केला. अर्थात, त्यानंतरही बायर्नचा खेळ लौकिकास साजेसा नव्हता. त्यांनी गोलच्या अनेक संधी दवडल्या. अर्थात, त्यांना मोसमातील गेल्या नऊ लढतींतील तिसरा विजय समाधान देत असेल. डॉर्टमंडने 2010-11 मध्ये विजेतेपद जिंकताना बायर्नवर मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर प्रथमच डॉर्टमंड सुस्थितीत आहेत. 

रोनाल्डोचा दहावा गोल 
ख्रिस्तियानो रोनाल्डोने सिरी ए मधील 14 व्या सामन्यातील दहावा गोल केला. त्याच्या युव्हेंटिसने फ्लोरेंटिनास 3-0 असे पराजित करीत इटालियन साखळीत अन्य प्रतिस्पर्ध्यांना 11 गुणांनी मागे टाकले. या सामन्यात रोनाल्डोला यलो कार्डलाही सामोरे जावे लागले. तो मैदानात परतल्यावर त्याला लगेच बदलण्यात आले. युव्हेंटिसचा या मोसमातील हा तेरावा विजय, तर सलग पाचवा. 

रेयाल माद्रिदचा विजय 
रेयाल माद्रिदने व्हॅलेन्सियाला 2-0 असे हरवून ला लिगामध्ये पाचवा क्रमांक मिळवला. सॅंतिएगो स्कॉलेरी यांच्या मार्गदर्शनाखाली रेयालचा हा सहाव्या सामन्यातील पाचवा विजय आहे. त्यांच्यात आणि बार्सिलोनात आता दोनच गुणांचा फरक आहे. आघाडीवरील व्हॅलेन्सियाने रेयालला तीन गुणांनी मागे टाकले आहे. 

हेन्‍रीच्या मोनॅकोची पीछेहाटच 
थिएरी हेन्‍रीच्या मोनॅकोला लीग वनमध्ये पुन्हा हार पत्करावी लागली. त्यांनी अखेरच्या मिनिटात दोन गोल स्वीकारत मॉंटपेलिएरविरुद्ध 1-2 हार स्वीकारली. या पराभवामुळे मोनॅको वीस संघांच्या साखळीत 19 व्या क्रमांकावर गेले. काही दिवसांपूर्वीच मोनॅकोला ऍटलेटिको माद्रिदविरुद्ध हार पत्करावी लागली होती. त्यामुळे ते चॅम्पियन्स लीगमध्ये गटात तळाला जाणार, हे स्पष्ट झाले होते. गोलच होत नसतील, तर कसे जिंकणार, अशी विचारणा मोनॅकोचे मार्गदर्शक हेन्‍री यांनी केली. 
 

 
 


​ ​

संबंधित बातम्या