INDvBAN : बांगलाचे वाघ पडले यजमानांवर भारी; पहिल्या T20 सामन्यात भारताचा पराभव

वृत्तसंस्था
Sunday, 3 November 2019

विश्‍वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून बांगलादेशच्या मालिकेकडे पाहत असलेल्या भारतास सलामीलाच धक्का बसला.

नवी दिल्ली : विश्‍वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून बांगलादेशच्या मालिकेकडे पाहत असलेल्या भारतास सलामीलाच धक्का बसला. प्रदूषणामुळे जास्तच चर्चेत राहिलेल्या या लढतीत मुशफीकर रहीमने दमदार अर्धशतक करीत भारतास हार पत्करण्यास भाग पाडले. त्यामुळे भारतास बांगलादेशविरुद्ध प्रथमच ट्‌वेंटी 20 लढतीत हार पत्करावी लागली.

धुरक्‍याची जास्त चर्चा असताना सुरू झालेली भारतीय फलंदाजी बहरलीच नाही. अखेरच्या दोन षटकांत 30 धावा झाल्यामुळे भारतास दीडशेनजीक धावा करता आल्या. अर्थात, या खूपच तोकड्या असल्याचे दाखवताना मुशफीकरने आक्रमण आणि बचाव याचा चांगला संगम साधला. तो 2 बाद 54 अशी अवस्था असताना मैदानात आला. त्यानंतर त्याने सहकाऱ्यांच्या तुलनेत कमी चेंडू खेळताना जास्त धावा केल्या आणि भारताच्या नवोदित संघास हार मानण्यास भाग पाडले.

दिल्लीच्या खेळपट्टीवरून चेंडू कमी वेगाने येतो, पण तिथे आयपीएलच्या लढती खेळण्याचा अनुभवही उपयोगी पडला नाही, त्याच वेळी ही फलंदाजी कशी असावी हे मुशफीकरने दाखवले. त्याने सौम्या सरकारसह 60 आणि महमदुल्लासह 30 धावांची भागी करीत बांगलादेशला विजयी केले.

अतिआक्रमक रोहित शर्मा आणि अडखळता शिखर धवन चांगली सुरुवात करून देऊ शकले नाहीत. जम बसला असे वाटत असतानाच श्रेयस अय्यर, रिषभ पंत परतले आणि भारतीय डावास क्वचितच गती आली. सर्वाधिक 42 धावा करण्यासाठी धवन 41 चेंडू घेत होता. त्यातच बांगलादेशच्या गोलंदाजांनी गतीत हुशारीने बदल करीत अनुनभवी नवोदित फलंदाजांसाठी धावा अवघड केल्या. वॉशिंग्टन आणि पंड्याच्या 10 चेंडूत 28 धावांच्या नाबाद भागीदारीने धावसंख्या आव्हानात्मक झाली.

संक्षिप्त धावफलक- भारत ः 6 बाद 148 (रोहित शर्मा 9- 5 चेंडूत 2 चौकार, शिखर धवन 41- 42 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार, केएल राहुल 15, श्रेयस अय्यर 22- 13 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार, रिषभ पंत 27- 26 चेंडूत 3 चौकार, शिवम दुबे 1, कृणाल पंड्या नाबाद 15- 8 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार, वॉशिंग्टन सुंदर नाबाद 14- 5 चेंडूत 2 षटकार, शफीऊल इस्लाम 4-0-36-2, अमिनुल इस्लाम 3-0-22-2)

बांगलादेश ः 19.3 षटकांत 154 (मोहम्मद नईम 26- 28 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार, सौम्या सरकार 39- 35 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार, मुशफीकर रहीम नाबाद 60- 43 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार, महमुदुल्ला नाबाद 15- 7 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार, चाहर 3-0-24-1, खलील अहमद 4-0-37-1, युजवेंद्र चाहल 4-0-24-1)

लक्षवेधक

- भारत बांगलादेशविरुद्ध ट्‌वेंटी 20 मध्ये प्रथमच पराजित. यापूर्वीच्या आठ लढतीत विजय
- सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ट्‌वेंटी 20 खेळण्याच्या भारतीय क्रमवारीत रोहित शर्मा (99) अव्वल. महेंद्रसिंग धोनीच्या 98 लढती
- रंजन मदुगल यांचा सामनाधिकारी या नात्याने शंभरावा सामना. केवळ जेफ क्रो यांच्याच (119) लढती जास्त
- भारतीय संघात पाच डावखुरे फलंदाज. ट्‌वेंटी 20 लढतीत हे पाचव्यांदा.


​ ​

संबंधित बातम्या