बांगलादेशला खुमखुमी आहे

सुनंदन लेले
Thursday, 20 September 2018

आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकन संघाला पराभवाचा दणका देणार्‍या बांगलादेश संघाला भारतीय संघाला पराभूत करायची खुमखुमी आहे. आतापर्यंत झालेल्या 33 एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने 27 आणि बांगलादेशने फक्त 5 सामने जिंकलेले असले तरी बांगलादेश संघाला नेहमी भारतीय संघाला पराभूत करायचे स्वप्न पडत असते. 2007 विश्वकरंडक स्पर्धेत भारताला हरवल्यापासून प्रत्येक सामन्यात आपल्याला संधी असल्याच्या जिद्दीने बांगलादेश संघ भारताविरुद्ध खेळताना मैदानात उतरतो. बांगलादेशी पाठीराखे प्रचंड आवाजी पाठिंबा त्यांना देतात. म्हणून शुक्रवारी ऐन सुट्टीच्या दिवशी होणार्‍या सुपर 4 च्या सामन्याला धार येणार आहे.

हे मान्य करावेच लागेल की गेल्या चार वर्षात बांगलादेश संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मोठी प्रगती केलेली आहे. दिवस चांगला असला आणि सगळी भट्टी जमून आली तर बांगलादेश संघ जगातील कोणत्याही संघाला टक्कर देऊ शकतो. तमीम इक्बाल, मुश्फीकूर रहीम आणि शाकीब या तिघांनी फलंदाजीची बाजू समर्थपणे सांभाळली आहे. गोलंदाजीत दुबईच्या संथ विकेटवर बांगलादेशी फिरकी गोलंदाज योग्य परिणाम साधू शकतात.

भारतीय संघ बांगलादेश संघाला संधी देण्याची चूक करणार नाही. पाकिस्तानविरुद्ध चांगला खेळ केल्याने भारतीय संघाला लय सापडली आहे. हार्दिक पंड्याला दुखापत झाली असल्याने त्याची जागा अक्षर पटेलला मिळू शकते. तसेच मनिष पांडे आणि लोकेश राहुलला संघात जागा देताना दिनेश कार्तिकला कदाचित बाहेर बसवले जाऊ शकते. अंबाती रायुडुकडे कायमचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संघ बघायला लागले आहे. 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर केदार जाधव भेटला असता तो म्हणाला, ‘‘दोन सामन्यात फलंदाजी करायची जास्त संधी मला मिळाली नाही. विराट संघात असला की इतकी चांगली फलंदाजी करतो की आम्हांला बर्‍याचवेळा संधी मिळत नाही. तो नसल्याचा तो फायदा आहे. मला इतकेच म्हणायचे आहे की फलंदाजी असो वा गोलंदाजी कसेही करून संघाच्या यशात वाटा मला उचलता यायला हवा. गोलंदाजी करताना मी फक्त नेम धरून स्टंपमध्ये चेंडू टाकतो. फलंदाजांना फटके मारायला सोपे चेंडू देत नाही. धोनी मला बरोबर मार्गदर्शन करतो. अगदी खरे सांगू, 6 महिने दुखापतीतून सावरून मी येतोय. संघापासून लांब राहण्याचे दु:ख काय असते याची मला जाणीव आहे. म्हणूनच प्रत्येक सामना माझ्याकरता मोलाचा आहे. बांगलादेश संघाविरुद्ध आम्ही जोरदार खेळ करू.’’ 

गुरुवारचा सामना अंतिम फेरी गाठण्याकरता मोलाचा असल्याने दोनही संघ सर्व शक्ती पणाला लावणार आहेत.

संबंधित बातम्या