सात्विक-चिराग जिंकले, पण हरले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 July 2021

चिराग शेट्टी-सात्विक साईराज रांकीरेड्डी यांनी ऑलिंपिक बॅडमिंटनच्या  पुरुष दुहेरीतील अखेरच्या साखळी सामन्यात बेन लेन आणि सीन वेंडी या ब्रिटनच्या जोडीला दोन गेममध्येच हरविले, पण अव्वल मानांकित इंडोनेशियन जोडी, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या असलेल्या तैवानच्या जोडीविरुद्ध पराजित झाल्यामुळे भारताचे आव्हान साखळीतच आटोपले.

टोकियो/ मुंबई - चिराग शेट्टी-सात्विक साईराज रांकीरेड्डी यांनी ऑलिंपिक बॅडमिंटनच्या  पुरुष दुहेरीतील अखेरच्या साखळी सामन्यात बेन लेन आणि सीन वेंडी या ब्रिटनच्या जोडीला दोन गेममध्येच हरविले, पण अव्वल मानांकित इंडोनेशियन जोडी, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या असलेल्या तैवानच्या जोडीविरुद्ध पराजित झाल्यामुळे भारताचे आव्हान साखळीतच आटोपले.

भारतीय, इंडोनेशियन तसेच तैवानच्या जोडीचे समान गुण झाले. भारतीय जोडीने तैवानला तीन गेममध्ये हरवले होते; तर इंडोनेशियन जोडीविरुद्ध दोन गेममध्येच हरले होते; तर इंडोनेशियन जोडीने तैवानच्या जोडीविरुद्ध तीन गेममध्ये हार पत्करली. अर्थातच भारतीयांनी जिंकलेला एक गेम कमी झाला आणि त्यामुळे भारतीय बाहेर गेले. चिराग आणि सात्विक अखेरच्या साखळी सामन्यासाठी सराव करीत असतानाच नजीकच्या कोर्टवरील निकालाने आपल्याला स्पर्धेबाहेर काढले आहे हे त्यांनी जाणले होते. तैवान आणि इंडोनेशियाच्या जोडीची कामगिरी ५-२ होत असताना भारतीयांची कामगिरी ४-३ झाली.

ली यांग- वँग ची-ली या तैवानच्या जोडीने विजय मिळविला, त्या वेळीच आम्ही स्पर्धेबाहेर आहोत हे आम्हाला कळले होते. सरस प्रतिस्पर्ध्यांना हरवल्यानंतरही आम्हाला स्पर्धेबाहेर जावे लागले होते, पण खेळात हे असे होतेच. ते स्वीकारावे लागते, असे चिरागने सांगितले. साखळीतील दोन लढती जिंकल्यानंतरही स्पर्धेबाहेर जावे लागल्याने सात्विकही निराश होता. अखेरच्या लढतीपूर्वी आव्हान संपले असल्याने आमच्यावर कोणतेही दडपण नव्हते. काहीही असो, इंडोनेशियन जोडी पराजित होईल असे कधीही वाटले नव्हते. या स्पर्धेने खूप काही शिकवले आहे असे तो म्हणाला.

भारतीयांनी अखेरची साखळी लढत २१-१७, २१-१९ अशी जिंकली. साखळीत बाद झाल्याचे कळल्यामुळे सात्विक - चिरागला सुरवातीस लक्ष केंद्रित करणे अवघड झाले होते, त्यामुळे त्यांना सुरुवातीस ७-७ बरोबरीस सामोरे जावे लागले,पण त्यानंतर त्यांनी आघाडी क्वचितच गमावली. दुसऱ्या गेममध्ये भारतीयांच्या खेळात चढ-उतार झाले, पण एकमेकांना प्रोत्साहित करीत त्यांनी १८-१९ पिछाडीनंतर गेम तसेच लढत जिंकली, पण त्याचा त्यांना फारसा आनंद झाल्याचे दिसले नाही.


​ ​

संबंधित बातम्या