साईना नेहवाल, कश्‍यपची सुपर स्पर्धेतून माघार 

संजय घारपुरे
Wednesday, 7 October 2020

एका स्पर्धेसाठी डेन्मार्कला जाण्याचा धोका कशाला - साईना, कश्‍यप 

नवी दिल्ली : साईना नेहवाल आणि पारुपली कश्‍यप या दाम्पत्याने डेन्मार्क ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. केवळ एका स्पर्धेसाठी डेन्मार्कला जाण्याचा धोका कशाला घ्यायचा, अशी विचारणा त्यांनी केली आहे. नव्या वर्षापासूनच आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग सुरू करण्याचे त्यांनी ठरवले आहे. 

मार्चमधील ऑल इंग्लंड स्पर्धेनंतर सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द होत आहेत. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांचे पुनरागमन डेन्मार्क ओपनद्वारे होणार होते. जानेवारीपासूनच स्पर्धा सहभाग सुरू करण्याचे ठरवले असल्याचे सांगत साईनाने डेन्मार्कला न खेळण्याचे ठरवले आहे. साईना तसेच कश्‍यपने गेल्या महिन्यात या स्पर्धेत खेळणार असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघटनेस कळवले होते. 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटरचा अपघातात मृत्यू ; रुग्णालयात घेतला अखेरचा...

जागतिक बॅडमिंटन महासंघाने डेन्मार्कमधील थॉमस - उबेर स्पर्धा (3 ते 11 ऑक्‍टोबर) लांबणीवर टाकताना डेन्मार्क मास्टर्स स्पर्धा (20 ते 25 ऑक्‍टोबर) रद्द केली आहे. आता या दरम्यान ठरलेली केवळ डेन्मार्क ओपन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा या वर्षातील अखेरची स्पर्धा असण्याची शक्‍यता आहे. तीन स्पर्धांसाठी डेन्मार्कला जाण्यात अर्थ होता. आता एका स्पर्धेसाठी जाण्याचा धोका पत्करण्यात अर्थ नाही. जानेवारीपासून स्पर्धा सहभाग सुरू करणेच योग्य होईल, असे कश्‍यपने सांगितले. 

पी. व्ही. सिंधूने यापूर्वीच या स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारतीय बॅडमिंटन महासंघाने नव्याने कार्यक्रम तयार करताना डेन्मार्क आणि बॅंकॉकला तीन स्पर्धा जाहीर केल्या होत्या, मात्र काही दिवसातच डेन्मार्क ओपन वगळता अन्य स्पर्धा रद्द केल्या.


​ ​

संबंधित बातम्या