पी. व्ही. सिंधूसमोर जपानच्या अकेन यामागुचीचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 July 2021

आगामी खडतर लढतींसाठी आपली तयारी असल्याचे दाखवून देताना जागतिक विजेत्या पी. व्ही. सिंधूने धोकादायक ठरू शकणाऱ्या मिआ ब्लिशफेल्ड हिचा दोन गेममध्ये पराभव केला. आता गतवेळच्या उपविजेत्या सिंधूसमोर जपानच्या अकेन यामागुचीचे आव्हान असेल.

टोकियो / मुंबई - आगामी खडतर लढतींसाठी आपली तयारी असल्याचे दाखवून देताना जागतिक विजेत्या पी. व्ही. सिंधूने धोकादायक ठरू शकणाऱ्या मिआ ब्लिशफेल्ड हिचा दोन गेममध्ये पराभव केला. आता गतवेळच्या उपविजेत्या सिंधूसमोर जपानच्या अकेन यामागुचीचे आव्हान असेल.

सिंधूने बाद फेरीतील पहिली लढत २१-१५, २१-१३ अशी जिंकली, त्यानंतर यामागुचीने कोरियाच्या किम गॅएऊन हिचे आव्हान २१-१७, २१-१८ असे परतवले. सिंधूला मिआविरुद्धचा विजय नक्कीच सुखावत असेल. यापूर्वीच्या दोघींतील लढतींचा केवळ गुणांच्या निकषावर विचार केल्यास सिंधूचा हा सगळ्यात सोपा विजय आहे. दोन वर्षांपूर्वी जागतिक स्पर्धा जिंकताना मिळविलेल्या विजयापेक्षा हा विजय जास्त सहज होता.

यंदा स्पर्धांचा मोसम पुन्हा सुरू झाल्यावर मिआने थायलंड ओपनमध्ये सिंधूला हरविले होते, पण सिंधूने स्वीस ओपनमध्ये त्याचे उट्टे काढले होते. आता टोकियोतील लढतीच्यावेळी सुरवातीची दोन गुणांची पिछाडी सोडल्यास सिंधू कधीही मागे पडली नाही. अर्थात मिआला ६-१३ पिछाडी १५-१६ कमी करण्याची संधी सिंधूनेच दिली. मात्र याचा परिणाम झाला नसल्याचे दाखविताना सिंधूने पहिल्या गेममध्ये अखेरचे पाच आणि दुसऱ्या गेममधील पहिले पाच गुण जिंकले.

मिआचा प्रतिकार सुरू झाला असे वाटत असतानाच सिंधूने सलग दहा गुण जिंकत तिची चिकाटी दाखविली. त्याच कामगिरीने मिआच्या प्रतिकाराच्या आशा दुरावल्या. मिआ सहज हार मानत नव्हती, पण सिंधूने दोघींतील अंतर किमान तीन गुणांचे ठेवले. मिआने सिंधूचा बॅकहँड टार्गेट केला होता. हा अपवाद सोडल्यास सिंधूचा खेळ चांगला होता. 

माझी सुरुवात चांगली होती. पहिल्या गेममध्ये बचावात्मक फटका काहीसा लवकर खेळत असल्याचे मार्गदर्शकांनी लक्षात आणून दिले. त्यानंतर ही चूक सुधारली. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून आघाडी राखली. सामन्यावरील नियंत्रण मोलाचे होते. महत्त्वाच्या स्पर्धेत माझा खेळ उंचावतो ही माझी खासियत असल्याचे सांगितले जाते. माझ्यासाठी प्रत्येक गेम महत्त्वाचा असतो, तसेच सामन्यातील प्रत्येक गुणाच्यावेळी एकाग्रता साधणेही तेवढेच आवश्यक असते.
- पी. व्ही. सिंधू

आजचे आव्हान

  • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या असलेल्या अकेन यामागुचीविरुद्ध लढत
  • प्रतिस्पर्ध्यामधील लढतीत सिंधूचे ११-७ वर्चस्व
  • दोघींतील गेल्या चारपैकी तीन लढतीत सिंधू पराजित
  • यंदाच्या ऑल इंग्लंड स्पर्धेत सिंधूची सरशी
  • जागतिक टूर स्पर्धेच्या साखळीतही सिंधूचा विजय
  • जागतिक क्रमवारीत यामागुची ५ वी, तर सिंधू ७ वी

​ ​

संबंधित बातम्या