नाटेकर हे खरेखुरे लिजंड - गोपीचंद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 July 2021

नंदू नाटेकर हे आमच्यासाठी देशातील बॅडमिंटनचे खरेखुरे लिजंड होते. सर्वांसाठी आदरयुक्त असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या मृदभाषी आणि अतिशय संयमी व्यक्तिमत्त्वाबाबत आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत.

नवी दिल्ली - नंदू नाटेकर हे आमच्यासाठी देशातील बॅडमिंटनचे खरेखुरे लिजंड होते. सर्वांसाठी आदरयुक्त असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या मृदभाषी आणि अतिशय संयमी व्यक्तिमत्त्वाबाबत आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. केवळ बॅटमिंटन नव्हे तर अव्वल दर्जाचे टेनिसही ते खेळले होते. सुरेश गोएल, दिनिश खन्ना आणि प्रकाश पदुकोन यांच्यामध्ये मी नाटेकर सरांना वरचे स्थान देईन, अशी आदरांजली गोपीचंद यांनी व्यक्त केली.

१९५१-५२ मध्ये राष्ट्रीय ज्युनियर टेनिस स्पर्धेत अंतिम सामन्यात रामनाथन कृष्णन यांच्याकडून नंदू नाटेकर यांची हार झाली नसती तर नाटेकर यांनी टेनिस खेळातच कारकीर्द केली असती. नाटेकर सर सभ्यगृहस्थ होतेच तसेच ते फारच संयमी आणि शांत स्वभावाचे होते. सध्याच्या बॅडमिंटनबाबतही त्यांना चांगलीच जाण होती. मुळातच ते चांगले ॲथलीट असल्यामुळे टेनिस आणि बॅडमिंटन असे दोन खेळ उच्चस्तरावर खेळू शकले, असेही गोपीचंद यांनी म्हटले आहे.

नजाकतदार खेळाडू
नाटेकर यांच्यासह महाराष्ट्र संघातून खेळलेले अब्दुल शेख आपल्या मित्राला आदरांजली वाहताना म्हणाले, त्यांचा खेळात चांगलाच नजाकतपणा होता, असा खेळाडू मी माझ्या आयुष्यात पाहिला नव्हता.  अब्दुल शेख हे १९६७ पासून कॅनडात वास्तव्यास आहेत. कॅनडाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचे ते राष्ट्रीय प्रशिक्षकही राहिलेले आहेत.

१९६० मध्ये झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेत आम्ही दुहेरीत एकत्रित खेळलो होतो. अंतिम सामन्यात आमचा मलेशियाकडून पराभव झाला होता. मलेशियाचा स्टार खेळाडू वाँग पेन सूनचे फटके ते बॅकहँडवर चांगलेच परतवत असायचे. त्यांचे पदलालित्यही सफाईदार होते. नाटेकर हे चांगले गायकही असल्याचे शेख म्हणाले. त्याकाळी आम्ही राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी ट्रेनने प्रवास करायचो, त्यावेळी नाटेकर यांच्या गायनाने प्रवास सुकखर व्हायचा, अशा आठवणी शेख यांनी सांगितल्या.

हातात कमालीची सहजता - विमल कुमार
नाटेकर यांच्या हातात कमालीची सहजता होती, माझे वडील नाटेकर यांचे चाहते होते म्हणून मला त्यांनी बॅडमिंटन खेळाची गोडी लावली. तिरुअनंतपुरम (पूर्वीचे त्रिवेंद्रम) येथील एका राष्ट्रीय स्पर्धेत नाटेकर यांचा खेळ माझ्या वडिलांनी पाहिला आणि ते प्रभावीत झाले. त्यानंतर त्यांनी घरामध्ये छोटेखानी कोर्ट तयार करून मला बॅडमिंटन खेळायला लावले, अशी महिती भारताचे माजी प्रशिक्षक विमल कुमार यांनी दिली. १९८० मध्ये ऑल इंग्लंड वयस्क बॅडमिंटन स्पर्धेत विजेते होतानाचा त्यांचा खेळ थेट पहाण्याची संधी मला मिळाली होती, असे विमल कुमार म्हणाले.

नंदू नाटेकर यांच्या निधनाने आपण जगातील उत्तम बॅकहँड खेळणारा खेळाडू गमावला, त्यांच्या खेळाचे व्हिडीओ आपल्याकडे उपलब्ध नाहीत, त्यामुळे ते किती महान होते हे आत्ताच्या पिढीला समजणे कठीण आहे.
- उदय पवार


​ ​

संबंधित बातम्या