बॅडमिंटन संघांना सोपा ड्रॉ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 August 2021

बॅडमिंटनमधील प्रतिष्ठेच्या थॉमस आणि उबेर करंडक स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांना सोपा ड्रॉ मिळाला आहे. ही स्पर्धा आर्हुस (डेन्मार्क) येथे ९ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत होत आहे.

नवी दिल्ली - बॅडमिंटनमधील प्रतिष्ठेच्या थॉमस आणि उबेर करंडक स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांना सोपा ड्रॉ मिळाला आहे. ही स्पर्धा आर्हुस (डेन्मार्क) येथे ९ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत होत आहे.

भारतीय पुरुषांचा ‘क’ गटात गतविजेत्या चीनसह समावेश करण्यात आला आहे. नेदरलँडस आणि ताहिती हे इतर देश या गटात आहेत, त्यामुळे चीनसह भारताला पुढच्या फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. भारतीय महिलांना ब गटात स्थान देण्यात आले आहे. या गटात गतउपविजेते थायलंड, स्पेन आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे.

स्पर्धेचा ड्रा आज क्वालालंपूर येथे काढण्यात आला. प्रत्येक गटातील दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. गतवेळेस २०१८ मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताचे पुरुष आणि महिला दोन्ही संघ बाद फेरी गाठू शकले नव्हते.

महिलांसाठी असलेल्या उबर करंडक स्पर्धेत २०१६ मध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पराभूत झाला होता. त्याअगोदर २०१४ मध्ये दिल्लीत झालेल्या स्पर्धेतही भारतीय महिलांनी उपांत्य फेरी गाठली होती.

या स्पर्धेत इंडोनेशियाचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. त्यांनी थॉमस कप १३ वेळा जिंकलेला आहे. त्यांचा अ गटात समावेश असून त्यांच्यासह तैपेई, अल्गेरिया, थायलंड हे संघ आहेत; तर ड गटात जपान, मलेशिया, कॅनडा आणि इंग्लंड यांचा समावेश आहे.

ही स्पर्धा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार १६ ते २४ मे दरम्यान होणार होती, त्यानंतर १५ ते २३ ऑगस्ट असा कार्यक्रम तयार करण्यात आला होता, परंतु कोरोनामुळे अखेर ऑक्टोबरमध्ये स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या