इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पाक अपयशी ठरल्यास अझर अलीचे नेतृत्व संकटात...   

टीम ई-सकाळ
Tuesday, 11 August 2020

इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाला हार पत्करावी लागली.

वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेनंतर 5 ऑगस्टपासून इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेस सुरवात झाली. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाला हार पत्करावी लागली. त्यामुळे पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंनी संघाच्या कामगिरीवर चांगलीच टीका केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने, इंग्लंडविरुद्ध सुरू असलेली कसोटी मालिका जिंकण्यास पाकिस्तानचा संघ अपयशी ठरल्यास अझर अलीच्या कर्णधारपदाला धक्का लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या संघाच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेत पहिला सामना जिंकला. त्यामुळे पाकिस्तानला पहिल्या कसोटीत मजबूत स्थितीतून देखील पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वसीम अक्रमने, नुकत्याच पाकिस्तान संघाच्या पराभवावर चांगलीच टीका केली. तसेच पुढील सामन्यात संघाने कामगिरी न सुधारल्यास अझर अलीच्या कर्णधारपदावर संकट येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. तसेच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यात पाकिस्तानच्या संघाने चांगली कामगिरी करत, विजय मिळवल्यास अझर अलीकडे संघाचे कर्णधारपद कायम ठेवावे. अन्यथा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कर्णधारपदासाठी दुसऱ्या कोणत्यातरी खेळाडूला शोधण्याची गरज असल्याचे, परखड मत वसीम अक्रमने व्यक्त केले आहे.

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...       

या मालिकेतील दुसरा कसोटी सामना गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी साऊथॅम्प्टनच्या एजस रोझ बाऊल येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात मालिकेवर वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने इंग्लंडचा संघ मैदानावर उतरेल. तर पाकिस्तानचा संघ मालिकेत टिकून राहण्यासाठी या सामन्यात विजयासह पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानावर येईल.  

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली'  

मँचेस्टर येथील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर, सलामीवीर शान मसूदच्या शतकी खेळी आणि बाबर आझमच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात 326 धावा जमवल्या होत्या. तर 326 धावांची बरोबरी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाचा पहिला डाव 219 धावांवरच आटोपला. यानंतर पहिल्याच डावात आघाडी मिळवलेल्या पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना फक्त 169 धावाच उभारल्या. त्यामुळे 277 धावांचे लक्ष गाठण्यासाठी इंग्लंडला 7 गडी गमवावे लागले. पाकिस्तानने दिलेल्या 277 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था 5 गड्यांच्या मोबदल्यात 100 धावा अशी झाली होती. परंतु ख्रिस वॉक्स 84 आणि जोस बटलर 75 यांनी बनवलेल्या भागीदारीमुळे इंग्लंडने सामना तीन गडी राखत आपल्या खिशात घातला. या विजयामुळे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1 - 0 अशी आघाडी घेतली.          

          


​ ​

संबंधित बातम्या