बीडच्या अविनाश साबळेला राष्ट्रीय विक्रमासह टोकीयोचे तिकीट

नरेश शेळके
Saturday, 5 October 2019

येथील खलिफा स्टेडियमवर सुरु असलेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत भारताच्या मराठमोळ्या अविनाश साबळेने पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत तीन दिवसांत दुसऱ्यांदा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आणि पुढील वर्षी होणाऱ्या टोकीयो आॉलिंपीकची पात्रताही गाठली.

दोहा : येथील खलिफा स्टेडियमवर सुरु असलेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत भारताच्या मराठमोळ्या अविनाश साबळेने पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत तीन दिवसांत दुसऱ्यांदा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आणि पुढील वर्षी होणाऱ्या टोकीयो आॉलिंपीकची पात्रताही गाठली.

बीड जिल्ह्यातील असलेल्या अविनाशला अंतिम फेरीत तेराव्या स्थान मिळाले असले तरी राष्ट्रीय विक्रमासह आॉलिंपीकचे तिकीट मिळाल्याने तो खुष होता. प्राथमीक फेरीत त्याने 8 मिनिटे 25.23 सेकंदाचा विक्रम केला होता. हा विक्रम अविनाशने 8 मिनिटे 21.37 सेकंद वेळ नौंदवित मोडून काढला. टोकीयो आॉलिंपीकसाठी 8 मिनिटे 22.00 सेकंद अशी पात्रता वेळ ठेवण्यात आली आहे. आजच्या कामगिरीमुळे सेनादलात कार्यरत असलेला अविनाश टोकीयोसाठी पात्र ठरला.

शर्यतीनंतर तो म्हणाला, भारतात थेट अंतिम शर्यत होते. येथे तीन दिवसांत दोन शर्यती झाल्या. तीन दिवसांत दोन उच्च दर्जाच्या शर्यती धावण्याची सवय आणि अनुभव नसल्याने कामगिरीवर परिणाम झाला. प्राथमीक फेरीत ज्याप्रमाणे शरीराने साथ दिली तशी साथ अंतिम फेरीत मिळाली नाही, अन्यथा आणखी कामगिरी उंचावली असती. टोकीयोच्या तयारीसाठी महाराष्ट्र शासनाने माझा त्यांच्या मिशन-2020 यात समावेश करावा, अशी विनंती करतो. कारण आशियाई रौप्यपदक जिंकले, राष्ट्रीय विक्रम मोडल्यानंतरही अजून मला महाराष्ट्र शासनाने कुठलीही मदत केली नाही. आता तरी माझ्या विनंतीला मान द्यावा, असे अविनाश म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या