मला त्यांनी 'ओसामा' म्हणून हिणवलं; मोईन अलीचा गौप्यस्फोट

वृत्तसंस्था
Saturday, 15 September 2018

भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या अष्टपैलू मोईन अलीने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूवर आरोप करत क्रिकेटविश्वात खळबळ उडविली आहे. 

इंग्लंड : भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या अष्टपैलू मोईन अलीने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूवर आरोप करत क्रिकेटविश्वात खळबळ उडविली आहे. 

मोईन अलीने 2015 मध्ये झालेल्या अॅशेस मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपल्याविरोधात वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे. ''2015ची अॅशेस मालिका ही माझ्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. मी या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. मात्र एका प्रसंगामुळे माझं खेळावरील लक्ष विचलित झाले. एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने मला 'ओसामा' म्हणत हिणवले होते. मी जे ऐकले त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी पहिल्यांदाच कोणावरतरी इतका रागावलो होतो,'' टेलिग्राफ वृत्तपत्राशी बोलताना त्याने हे स्पष्ट केले. 

मोईन अली लवकरच स्वत:चे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. या महिन्याच्या अखेरीस मोईन अलीचे हे आत्मचरित्र त्याच्या चाहत्यांना वाचायला मिळणार आहे. या आत्मचरित्रातही त्याने हा प्रसंग नमूद केला आहे. 

''या प्रसंगाबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांना आणि प्रशिक्षकांना सांगितले त्यावर प्रशिक्षक ट्रेवर बायलिस यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्याकडे विचारणाही केली. लेहमन यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंना विचारले असता, त्या खेळाडूने आपण असे काही न बोलल्याचे सांगितले. हा प्रसंग घडला त्यावेळी मी एकटाच असल्याने मी तो आरोप सिद्ध करु शकलो नाही आणि त्यामुळे मला शांत रहावे लागले,'' असेही त्याने सांगितले.

संबंधित बातम्या