धावपटू हिमा पुन्हा जायबंदी; विश्‍व रिले स्पर्धेलाही मुकणार 

वृत्तसंस्था
Friday, 10 May 2019

दोहा येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेच्या पात्रतेच्या दृष्टीने रिले स्पर्धा महत्त्वाची आहे. मात्र, हिमाच्या दुखापतीमुळे भारतीय संघ आणखीच कमकुवत झाला आहे. आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेहून परत आल्यानंतर हिमाने पाच तारखेपासून सरावाला सुरुवात केली होती. मात्र, दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी तिला आणखी वेळ लागेल, असे भारतीय संघाचे उपमुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले.

नागपूर : गेल्या वर्षी विश्‍व ज्युनियर ऍथलेटिक्‍स स्पर्धेत चारशे मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या हिमा दाससाठी 2019 हे वर्ष फारसे चांगले नाही, असेच दिसत आहे. पाठीच्या दुखण्यामुळे तिला दोहा येथे आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत चारशे मीटरची शर्यत सोडून द्यावी लागली. या दुखण्याने अजून तिची पाठ सोडली नाही. त्यामुळे तिला शनिवारपासून योकाहामा (जपान) येथे सुरू होत असलेल्या विश्‍व रिले स्पर्धेला मुकावे लागणार आहे. 

दोहा येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेच्या पात्रतेच्या दृष्टीने रिले स्पर्धा महत्त्वाची आहे. मात्र, हिमाच्या दुखापतीमुळे भारतीय संघ आणखीच कमकुवत झाला आहे. आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेहून परत आल्यानंतर हिमाने पाच तारखेपासून सरावाला सुरुवात केली होती. मात्र, दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी तिला आणखी वेळ लागेल, असे भारतीय संघाचे उपमुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले. उपचार आणि तंदुरुस्ती प्रशिक्षणासाठी हिमा चारशे मीटरच्या इतर खेळाडूंसोबत पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे, असे नायर म्हणाले. तिला पूर्णपणे तंदुरुस्त व्हायला किती वेळ लागेल, हे सांगणे कठीण आहे. ती पूर्णपणे तंदुरुस्त झाली नाही तर तिचा विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील प्रवेशही धोक्‍यात आहे, असेच मानले जात आहे. 

योकाहामात भारतीय संघ पुरुष आणि महिलांच्या 4-400 रिलेसोबत 4-400 मिश्र रिलेत सहभागी होणार आहे. हिमाच्या माघारीमुळे महिला संघात एम. आर. पुवम्मा, व्ही. के. विस्मय्या, सरिता गायकवाड, सोनिया बशय्या आणि प्राची या पाच जणी आहेत. भारत सहभागी होत असलेल्या तिन्ही प्राथमिक शर्यती उद्याच होत आहेत. त्यामुळे मिश्र रिलेसाठी दोन महिला ऍथलिट्‌सची निवड करताना भारतीय संघ व्यवस्थापनाची चांगलीच दमछाक होणार आहे. प्रवेशिकेनुसार आरोक्‍य राजीव, ऍलेक्‍स ऍन्थोनी आणि जितू बेबी या पुरुषांची तर हिमा, सोनिया आणि प्राची या महिलांची नावे आहेत. यामुळे सोनिया किंवा प्राची यांच्यापैकी एकीवर दोन शर्यतींचा धावण्याचा अतिरिक्त भार येणार आहे. 

महिला रिले संघापुढे प्राथमिक फेरीतच कॅनडा, जमैका, युक्रेन आणि नायजेरिया संघाचे तर पुरुषांत बेल्जियम, जपान, फ्रान्स आणि जर्मनीचे आव्हान आहे. यात अंतिम फेरी गाठण्याची भारताला संधी कमीच आहे. मिश्र शर्यतीत भारतापुढे जमैका, बेल्जियम व ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. हा अडथळा पार केल्यास भारताचा दोहातील प्रवेश निश्‍चित होईल. 

दृष्टिक्षेपात 
- प्रक्षेपण ः स्टार स्पोर्टस 
- वेळ ः दुपारी 3.08 ते सायंकाळी 6.25 (11 मे) 
ः दुपारी 2.40 ते 5.07 (12 मे) 
(भारतीय वेळेनुसार) 
- शटल हर्डल्स आणि 2 बाय 2 बाय 400 मीटचे पदार्पण 
- शटल हर्डल्समध्ये दोन पुरुष, दोन महिलांचा समावेश 
- 2 बाय 2 बाय 400 मध्ये एक पुरुष व एका महिलेचा समावेश 
- 4-400 रिलेत प्रथम दहा तर मिश्र रिलेत प्रथम बारा संघ विश्‍व स्पर्धेसाठी पात्र ठरणार

संबंधित बातम्या