आशियाई कुस्ती : साक्षी, बजरंगवर भारताच्या आशा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 April 2019

झिआन (चीन) : ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेते साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यावर उद्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या आशा केंद्रित असतील.

झिआन (चीन) : ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेते साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यावर उद्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या आशा केंद्रित असतील.

साक्षी, बजरंग खेरीज विनेश फोगट हे भारतीय संघातील आणखी एक आघाडीचे नाव असून, तिचेदेखील पदकाच्या शर्यतीत नाव घेतले जात आहे. पुरुष गटात भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविणाऱ्या राहुल आवारे याच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.
विनेश 53 किलो वजनी गटात प्रथमच खेळणार असल्याने तिच्या कामगिरीबाबत कमालीचे औत्सुक्‍य आहे. आशियाई स्पर्धेत ती प्रथमच या वजनी गटात खेळणार असली, तरी यापूर्वी बल्गेरियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने रौप्यपदकापर्यंत मजल मारली होती. याच स्पर्धेत बजरंगने 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून आपल्या कामगिरीतील सातत्य दाखवून दिले आहे. साक्षी 65 किलो वजनी गटात रौप्य, तर पूजा धांडा 59 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. त्यामुळे भारतीय कुस्तीगीरांकडून या वेळी अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.

अर्थात, या तिघी आशियाई स्पर्धेत वेगळ्या वजन गटातून खेळणार आहेत. साक्षी आपल्या जुन्या 62, नवज्योत 65 आणि पूजा 57 किलो वजनी गटातून खेळणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेतील ब्रॉंझपदकानंतर घोट्याच्या दुखापतीने सतावलेली दिव्या काक्रन विश्रांतीनंतर या स्पर्धेत 68 किलो वजनी गटातून उतरेल. एकूणच महिला कुस्तीगीरांची कामगिरी अधिक आश्‍वासक मानली जात आहे.
भारताचे प्रशिक्षक कुलदीप मलिक यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच आशियाई मल्लांचे वर्चस्व राहिले आहे. इराण, कोरिया, चीन आणि सोव्हिएत संघ राज्यातून बाहेर पडलेल्या देशांचे आव्हान राहिले आहे. त्यामुळे आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धा अधिक तगडी असते, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय चमकण्याचा आशियाई स्पर्धा पाया असते असे म्हटले तर चूक ठरणार नाही. त्यामुळेच भारतीय मल्ल आपले अधिक योगदान देण्याचा प्रयत्न करतील, यात शंका नाही.


​ ​

संबंधित बातम्या