सत्कार सोहळ्यात एशियाड पदकविजेतीने केजरीवालांना सुनावले 

वृत्तसंस्था
Thursday, 6 September 2018

दिल्ली सरकारने पुरेशी साथ दिली असती तर ब्रॉंझ नव्हे सुवर्णपदक जिंकले असते, असे दिव्याने सांगितले. तुम्ही आज आम्हाला बक्षीस देत आहात. जेव्हा खरी गरज होती, तेव्हा पाठीशी कोणीच नव्हते. हे पैसे तेव्हाच मिळाले असते तर अधिक चांगली तयारी झाली असती, सुवर्णपदक जिंकले असते.

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकल्यावर तुम्हाला सर्व काही मदत करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते, प्रत्यक्षात काहीच घडले नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी विनंती केल्यानंतरही मदत मिळाली नाही. आता पदक जिंकल्यावर तुम्ही आम्हाला बोलवत आहात, अशा शब्दांत आशियाई क्रीडा ब्रॉंझविजेती दिव्या काक्रण हिने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या समक्ष शाब्दिक हल्ला केला. 

दिल्ली सरकारने पुरेशी साथ दिली असती तर ब्रॉंझ नव्हे सुवर्णपदक जिंकले असते, असे दिव्याने सांगितले. तुम्ही आज आम्हाला बक्षीस देत आहात. जेव्हा खरी गरज होती, तेव्हा पाठीशी कोणीच नव्हते. हे पैसे तेव्हाच मिळाले असते तर अधिक चांगली तयारी झाली असती, सुवर्णपदक जिंकले असते. सुदैवाने माझ्यासाठी नोकरीही सोडणारे मार्गदर्शक लाभले. त्यांनी माझ्यासाठी बदामाची व्यवस्था केली, असे ती म्हणाली. 

दिल्ली मुख्यमंत्र्यांवर हल्ला करताना दिव्या म्हणाली, राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकल्यावर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सर्व मदत करण्यात येईल, असे आपण सांगितले होते, त्यानंतर मी याबाबत पत्र लिहिले, त्याला उत्तर नाही. माझे फोनही घेतले गेले नाहीत. आज सर्वच जण कौतुक करीत आहेत, बक्षीस देत आहेत, पण जेव्हा मला याची खरी गरज होती, त्या वेळी कोणीच नव्हते. आता खेळ सुरू केलेल्या मुलांकडे तरी लक्ष द्या. शेजारचा हरियाना पदक विजेत्यांना तीन कोटी देतो. दिल्ली सरकारने आता रक्कम वाढवून वीस लाखांवरून एक कोटी केली, दिव्याचा हा हल्ला सुरू असताना मुख्यमंत्री केजरीवाल, तसेच दिल्लीतील अनेक अधिकारी होते. 

अनेक खेळाडू त्यांचे प्रश्‍न मांडतात. आता परिस्थिती नक्कीच सुधारेल. आता नव्या धोरणानुसार खेळाडूंना कोणाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागणार नाही. आमची परिस्थिती काय होती, हे तुम्हीही जाणता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यात काहीसा बदल झाला आहे. 
- अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री.


​ ​

संबंधित बातम्या