एकच पदक जिंकल्याची खंत अन्‌ अभिमानही

डोला बॅर्नजी
Saturday, 4 August 2018

गेल्या काही वर्षांपासून दीपिका कुमारी भारतीय तिरंदाजीचा चेहरा झाली आहे. नुकत्याच झालेल्या बर्लिन स्पर्धेत ती पदकापासून दूर राहिली असली, तरी अमेरिका स्पर्धेतील सुवर्णपदक तिला नक्कीच चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित करेल.

गेल्या काही वर्षांपासून दीपिका कुमारी भारतीय तिरंदाजीचा चेहरा झाली आहे. नुकत्याच झालेल्या बर्लिन स्पर्धेत ती पदकापासून दूर राहिली असली, तरी अमेरिका स्पर्धेतील सुवर्णपदक तिला नक्कीच चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित करेल. तिच्याकडून चांगल्या कामगिरीची खात्री असल्यामुळे सहकारीही चांगली कामगिरी करीत भारतास सांघिक स्पर्धेत पदकाची आशा देऊ शकतात. दीपिकाला आता कधीच कोणी कमी लेखत नाही. तिचा आशियाई, ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचा अनुभव मोलाचा ठरेल. दोन वर्षांपूर्वी खूपच दुरावलेल्या ऑलिंपिक पदकाने तिला खूपच यातना झाल्या होत्या, आता त्याची काहीशी भरपाई करण्याचा तिचे लक्ष्य असेल. 

कम्पाउंड प्रकारात तुलनेने आव्हान कमी आहे, त्यामुळे येथे पदकाची जास्त आशा असेल. कम्पाउंडमध्ये सांघिक स्पर्धा नाही. तिथे मिश्र दुहेरी आणि वैयक्तिक स्पर्धा आहेत. पण जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या भारतीय संघातील मुलींविरुद्ध आपली लढत असल्याचे दडपण प्रतिस्पर्ध्यांवर नक्कीच येऊ शकेल. ज्योती सुरेखाचा जागतिक स्पर्धांतील अनुभव, तिथे लाभलेले यश, तिला त्रिशा डेबची लाभत असलेली तोलामोलाची साथ बघितली तर कंपाउंडमध्ये नक्कीच सोनेरी यशाची आशा बाळगता येईल, आताच्या या आव्हानाबद्दल बोलताना मला माझे यशदेखील आठवते. 

मुळात मी दीपिकाप्रमाणेच रिकर्व्ह प्रकारातील खेळाडू. त्यामुळे या प्रकारात ऑलिंपिक असो वा आशियाई स्पर्धा कोरियाचे आव्हान हे असतेच. तीन आशियाई स्पर्धा खेळल्यानंतर केवळ एक सांघिक ब्रॉंझपदक मिळविले याची खंत असली, तरी आशियाई पदकाची आठवण नक्कीच अजूनही आहे. आशियाई स्पर्धेत भारतासाठी किमान सांघिक प्रकारात पदक जिंकल्याचा अभिमान वाटतो. देशासाठी काही तरी केल्याचा हा अभिमान होता. त्याचवेळी कतारच्या स्पर्धेत ब्रॉंझपदकाची हरलेली लढतही आठवते. पण, बुसानच्या सातव्या क्रमांकाच्या तुलनेत प्रगती केल्याचे समाधान त्या वेळेस मिळाले. कोरियाला धक्का देणे कठिण आहे. पण, ते सत्य स्वीकारायलाच हवे. कारण त्यांना आव्हान देणे सोपे नाही. ऑलिंपिकपासून तिरंदाजीतील 40 पैकी 23 सुवर्णपदके एकट्या कोरियाने जिंकली आहेत. यावरून एकूणच आशियाई स्पर्धेतही आव्हान किती कठिण असेल याची कल्पना येते. 
 

संबंधित बातम्या