दोन्ही पायांना 6 बोटे असणाऱ्या स्वप्नाचे 'सुवर्ण' स्वप्न साकार

वृत्तसंस्था
Wednesday, 29 August 2018

दोन्ही पायाला सहा बोटे 
चहाच्या मळ्यात काम करणारी बसाना आणि रिक्षाचालक असलेल्या पंचानन या दांपत्यांची कन्या असलेल्या स्वप्नाच्या दोन्ही पायाला जन्मजात सहा बोटे आहेत. त्यामुळे सराव करताना तिला प्रचंड वेदनाही होतात आणि अडचणीचाही सामना करावा लागतो. त्याच्या पायाच्या मापाचा योग्य जोडा मिळत नाही. मिळाला तर फार काळ टिकत नाही.

जाकार्ता : गेल्या दोन दिवसांपासून डाव्या जबड्याला प्रचंड वेदना होत असतानाही पश्‍चिम बंगालच्या जलपायगुडी येथील स्वप्ना बर्मन हिने महिलांच्या हेप्टथलॉनमधील आठशे मीटरमध्ये बाजी मारली आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकाचे स्वप्न साकार केले. हेप्टथॉलनमधील भारताचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक होय. तिहेरी उडीतही अरपिंदरमुळे भारताला 48 वर्षांनी सुवर्ण मिळाले. 200 मीटर शर्यतीत द्युती चंद रौप्यपदकाची मानकरी ठरली. 

गेल्या वर्षी भुवनेश्‍वर येथे झालेल्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या 22 वर्षीय स्वप्नाने सात इव्हेंटच्या या क्रीडा प्रकारात सुरवातीपासून वर्चस्व गाजविले. चीनची वॅंग क्वीलिंग, जपानची युकी यामासाकी आणि भारताची पुर्णिमा हेम्ब्रम यांच्याकडून स्वप्नाला आव्हान होते. भालाफेकीत 50.63 मीटर अशी वैयक्तिक सर्वोत्तम करणारी स्वप्ना सहा इव्हेंटनंतर 5218 गुणांसह आघाडीवर होती आणि सुवर्णपदकासाठी शेवटच्या आठशे मीटरमध्ये तिला वॅंगला पराभूत करणे किंवा 2 मिनिटे 19 सेकंदांच्या आत शर्यत पूर्ण करणे असे दोन पर्याय होते. तिने वॅंगला पराभूत केले आणि 2 मिनिटे 21.13 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. स्वप्नापाठोपाठ शर्यत पूर्ण करणाऱ्या वॅंगला पुन्हा एकदा रौप्य मिळाले. पुर्णिमा हेम्ब्रमचे ब्रॉंझपदक 34 गुणांनी हुकले. चार वर्षांपूर्वी इन्चॉन येथे तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 

द्युतीला पुन्हा रौप्य 
दोनशे मीटरच्या उपांत्य फेरीत वेगवान वेळ दिल्याने द्युतीचंद सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार झाली होती. मात्र, सुवर्णपदक जिंकण्याचे तिचे मनसुबे बहरिनच्या शंभर मीटर शर्यतीतील सुवर्णपदक विजेत्या इडिडीओंग ओडिओंगने उधळून लावले. ओडिओंगने 22.96 तर द्युतीने 23.20 सेकंद अशी वेळ दिली. द्युतीच्या कामगिरीमुळे सरस्वती साहाने 2002 मध्ये मिळविलेल्या सुवर्णपदकानंतर भारताला प्रथमच यात पदक जिंकता आले. 

अरपिंदरची सुवर्ण उडी 
ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकणाऱ्या अरपिंदरने सुवर्णपदक जिंकून (16.77 मीटर) हा दुष्काळ संपविला. राकेशबाबूला सहावे स्थान मिळाले. राकेश बाबूने सुरवात चांगली केली होती. मात्र, त्याच्या पाठोपाठ असणाऱ्या अरपिंदरने त्याला दुसऱ्या प्रयत्नापासून त्याला मागे टाकण्यास सुरवात केली. तिसऱ्या प्रयत्नात त्याने मारलेली उडी सुवर्णपदकासाठी पुरेशी ठरली. 

स्वप्नाची कामगिरी 
100 अडथळा ः 13.98 सेकंद - 981 गुण 
उंच उडी ः 1.82 मीटर - 1003 
गोळाफेक ः 12.69 मीटर - 707 
200 मीटर ः 26.08 सेकंद - 790 
लांब उडी ः 6.05 मीटर - 865 
भालाफेक ः 50.63 मीटर - 872 
800 मीटर ः 2 मि.21.13 सेकंद - 808 गुण 
एकूण 6026 गुण (वैयक्तिक सर्वोत्तम) 
स्पर्धेपूर्वी सर्वोत्तम ः 5942 (भुवनेश्‍वर - 2017) 

दोन्ही पायाला सहा बोटे 
चहाच्या मळ्यात काम करणारी बसाना आणि रिक्षाचालक असलेल्या पंचानन या दांपत्यांची कन्या असलेल्या स्वप्नाच्या दोन्ही पायाला जन्मजात सहा बोटे आहेत. त्यामुळे सराव करताना तिला प्रचंड वेदनाही होतात आणि अडचणीचाही सामना करावा लागतो. त्याच्या पायाच्या मापाचा योग्य जोडा मिळत नाही. मिळाला तर फार काळ टिकत नाही.


​ ​

संबंधित बातम्या