Asian Games 2018 : हॉकीत भारताची नाचक्की 

वृत्तसंस्था
Thursday, 30 August 2018

मलेशिया भारताची कायम डोकेदुखी 
- 1998 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 0-1 पराभव 
- आशिया कपमध्ये भारताचा साखळीत 6-1 विजय, पण अंतिम फेरीत अखेरच्या वेळी 2-1 असा जेमतेम विजय 
- 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत जादा वेळेत मलेशियाची सरशी 
- गतवर्षी हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत 2-3 हार 
- गतवर्षी अझलन शाह स्पर्धेत अंतिम फेरीसाठी विजय आवश्‍यक असताना 0-1 हार 

जाकार्ता : भारतीय हॉकीची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करा असे भावनात्मक आवाहन सहकारी खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफला करणारा कर्णधार श्रीजेशच मलेशियाविरुद्ध कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरला आणि भारतास आशियाई क्रीडा हॉकीतील मलेशियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत सडन डेथवर 8-9 हार पत्करावी लागली. 

श्रीजेशला मलेशियाचे गोल रोखण्यात आलेले अपयश, तसेच एस. व्ही सुनीलने चुकवलेली अखेरची पेनल्टी हीट याबाबत जास्त चर्चा होत राहीलही, पण 107 सेकंद असताना भारतास 2-1 आघाडी राखता आली नाही. त्याहीपेक्षा पहिल्या सत्रात दवडलेल्या गोलच्या अर्धा डझन संधीनीच पराभवाचा पाया रचला होता. खर तर या सत्रात व्हिडिओ रेफरलच्या साह्याने मलेशियाचा गोल रद्द केला होता, त्यावेळेसच धोक्‍याची घंटा वाजली होती, पण कदाचीत भारतीयांचे त्याकडे दुर्लक्ष झाले होते. 
मलेशिया भारतीय हॉकीच्या प्रगतीतील कायम अडसर ठरले आहेत. भारतीय हॉकीपटूही हे जाणून होते. आक्रमक सुरवात करुनच गोल करावेत ही अपेक्षा होती, पण भारतास नेमके हेच जमले नाही. जागतिक हॉकीतील अव्वल संघांना आव्हान देत असलेला, चॅम्पियन्स करंडक उपविजेता भारत मलेशियाविरुद्ध पराजित होईल हे कोणासही वाटले नव्हते. गटसाखळीत तब्बल 76 गोल केलेल्या भारतास मलेशियाविरुद्धच्या पहिल्या गोलसाठी तिसऱ्या सत्रातील तिसऱ्या मिनिटापर्यंत प्रतिक्षा करावी लागली होती, त्यापूर्वी दवडलेले पाच पेनल्टी कॉर्नरच भारतास कायम सतावत राहतील. 

भारतीय पेनल्टी शूटआऊट तसेच सडनडेथमध्ये अपयशी ठरले, त्याहीपेक्षा सामन्यावर वर्चस्व असताना भारतीयांनी मलेशियास प्रतिकाराची संधी दिली. हरमनप्रीतने भारताचे खाते उघडल्यावर सहा मिनिटातच मलेशियाने गोल केला. यावेळी भारतीय आक्रमकांनी कॉर्नर दवडत मलेशियाला प्रतिआक्रमणाची संधी दिली आणि श्रीजेश सहच चकला. एका मिनिटातच वरुण कुमारने भारतास आघाडीवर नेले. सरदार सिंग आणि सुरेंदर कुमार यांना पाच मिनिटे बाहेर काढण्यात आले होते, त्यावेळी सुनीलने बचावात येत मलेशियास गोलपासून रोखले, पण हे दोघे आल्यावर भारतीय जणू बिनधास्त झाले आणि त्याचाच फटका बसला.

मलेशिया भारताची कायम डोकेदुखी 
- 1998 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 0-1 पराभव 
- आशिया कपमध्ये भारताचा साखळीत 6-1 विजय, पण अंतिम फेरीत अखेरच्या वेळी 2-1 असा जेमतेम विजय 
- 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत जादा वेळेत मलेशियाची सरशी 
- गतवर्षी हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत 2-3 हार 
- गतवर्षी अझलन शाह स्पर्धेत अंतिम फेरीसाठी विजय आवश्‍यक असताना 0-1 हार 

भारतासाठी ऑलिंपिक पात्रतेचे आव्हान 
आशियाई क्रीडा स्पर्धा विजेत्यांना ऑलिंपिक स्पर्धेत थेट प्रवेश होता. त्याचबरोबर प्रो हॉकी लीगमधूनही पात्रतेचा मार्ग होता. आता प्रो हॉकी लीगमध्ये भारताचा सहभाग नाही, तर एशियाड सुवर्णपदक दुरावले आहे. या परिस्थितीत हॉकी सिरीजचाच आधार भारतासाठी असेल. या हॉकी सिरीज फायनल एकंदर तीन असतील. त्या प्रत्येक स्पर्धेतून दोन संघ ऑलिंपिक पात्रता स्पर्धेस पात्र ठरतील. हे सहा संघ, प्रो हॉकी लीगमधील सर्वोत्तम चार संघ, तसेच ऑलिंपिकला पात्र न ठरलेल्या संघातील जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम दोन संघ अंतिम पात्रता स्पर्धेत असतील. या अखेरच्या पात्रता स्पर्धेतून सहा संघ ऑलिंपिकला जातील.


​ ​

संबंधित बातम्या