Asian Games 2018 : महिला हॉकीतही निराशाच 

वृत्तसंस्था
Friday, 31 August 2018

भारतीय महिला पात्र नव्हेत 
जपान ऑलिंपिकचे यजमान आहेत. त्यामुळे त्यांचा हॉकीतील सहभाग निश्‍चित आहे. त्यामुळे आशियाई क्रीडा उपविजेत्या भारतासही ऑलिंपिक प्रवेश मिळाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. प्रत्यक्षात जपानच्या या यशामुळे पात्रता स्पर्धेतून अतिरीक्त संघास प्रवेश देण्याचा नियम आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने यापूर्वीच केला आहे. भारतीय महिला हॉकी संघासही ऑलिंपिक पात्रता स्पर्धेद्वारेच टोकियोचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पुरुष तसेच महिलांची पात्रता स्पर्धा पुढील वर्षी मध्यास अपेक्षित आहे.

जाकार्ता : पुरुष संघाप्रमाणे साखळीत गोलधडाका केलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने जपानविरुद्धच्या निर्णायक लढतीत नांगी टाकली आणि ऑलिंपिक पात्रतेचा मार्ग खडतर करून घेतला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला हॉकीतील सुवर्ण लढतीत जपानने गोलच्या संधी दवडलेल्या भारताचा 1-2 पराभव झाला आणि त्यामुळे ऑलिंपिकच्या थेट प्रवेशाच्या आशाही संपल्या. 

हॉकी, फुटबॉलसारख्या खेळात वर्चस्व किंवा गोलच्या जास्त निर्माण केलेल्या संधी महत्त्वाच्या नसतात, तर गोल महत्त्वाचे असतात. जपानला गोलच्या एकंदर पाच संधी लाभल्या, त्यावर त्यांनी दोन गोल केले, तर भारतास दहापैकी एकाच संधीचे गोलात रूपांतर करता आले. योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात जपान वरचढ ठरले. त्यातच पुरुष संघाच्या अपयशामुळे आपल्याला सुवर्णपदक जिंकावेच लागेल याचे जास्तीचे दडपण महिला संघावर आले असावे. त्यामुळेच त्या चीनविरुद्ध जेवढ्या त्वेषाने खेळल्या तेवढा जोष, उत्साह क्वचितच जाणवत होता. 

जपानच्या योजना यशस्वी ठरल्या. पेनल्टी कॉर्नरवरील ड्रॅग फ्लीकवर गुरजीत गोल करू शकते हे जपानने जाणले होते, त्यांनी गोलक्षेत्रात गर्दी करीत भारतास पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यापासून रोखले. या परिस्थितीत वंदन कटारिया आणि कर्णधार राणी रामपाल या अनुभवी खेळाडूंकडून भारतास मोठ्या अपेक्षा होत्या, पण वंदनाच्या सदोष नेमबाजीने भारताचे काम अवघड केले. 

आक्रमण आणि बचावाची योग्य सांगड घालत जपानने सुरवातीस हुकुमत घेतली. त्यांनी पहिल्या सत्रात गोल करीत भारतास दडपणाखाली आणले. नेहा गोयलने दुसरे सत्र संपण्याच्या सुमारास भारतास बरोबरी साधून दिली, पण तिसऱ्या सत्रात जपानने आघाडी घेतली आणि चौथ्या सत्रात भारताने गोलसाठी केलेले अथक प्रयत्न विफल ठरले. 

अपयश महिलांचे 
- भारतीय महिला हॉकीचा सुवर्णदुष्काळ कायम 
- 1982 च्या दिल्ली एशियाडनंतरची सुवर्ण प्रतीक्षा कायम 
- 1998 प्रमाणेच अंतिम सामन्यात हार 
- अर्थात महिला हॉकीचे वीस वर्षांनी रौप्य 
- जपानने प्रथमच महिला हॉकीत सुवर्णपदक जिंकले 

भारतीय महिला पात्र नव्हेत 
जपान ऑलिंपिकचे यजमान आहेत. त्यामुळे त्यांचा हॉकीतील सहभाग निश्‍चित आहे. त्यामुळे आशियाई क्रीडा उपविजेत्या भारतासही ऑलिंपिक प्रवेश मिळाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. प्रत्यक्षात जपानच्या या यशामुळे पात्रता स्पर्धेतून अतिरीक्त संघास प्रवेश देण्याचा नियम आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने यापूर्वीच केला आहे. भारतीय महिला हॉकी संघासही ऑलिंपिक पात्रता स्पर्धेद्वारेच टोकियोचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पुरुष तसेच महिलांची पात्रता स्पर्धा पुढील वर्षी मध्यास अपेक्षित आहे.

​ ​

संबंधित बातम्या