आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हॉकीच्या सरावास सुरवात 

वृत्तसंस्था
Tuesday, 31 July 2018

विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेपूर्वी आशियाई स्पर्धेतील यश किती महत्त्वाचे आहे याची खेळाडूना कल्पना आहे. त्यामुळे शिबिरापासूनच भारतीय खेळाडू अधिक उर्जेने तयारीला सुरवात करतील. 
- हरेंदर सिंग, भारतीय संघाचे प्रशिक्षक

नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सरावाला सुरवात जाली आहे. आशियाई स्पर्धेपूर्वी हॉकी संघाची अनेक शिबिरे होणार असून, पहिले शिबिर उद्या बुधवारपासून "साई'च्या बंगळूर येथील केंद्रावर सुरू होईल. 

या शिबिरात स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 18 खेळाडूंसह सात राखीव खेळाडूंचा समावेश असेल. बांगलादेश, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय पुरुष खेळाडूंना 21 दिवसांची विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर उद्यापासून पहिले शिबिर सुरू होईल. हे पहिले शिबिर 11 दिवसांचे सेल. 

भारतीय संघाचे प्रशिक्षक हरेंदर सिंग म्हणाले,""व्यग्र कार्यक्रम पार पडल्यावर खेळाडूंना आवश्‍यक ती विश्रांती मिळाली आहे. आता आम्ही शिबिराला सुरवात करणार आहेत. उणिवा शोधून त्यावर काम करण्याबरोबर सरावाचा दर्जा सर्वोत्तम असाच राहिल.'' 

भारतीय खेळाडूंना विश्रांती आवश्‍यक होती, असे सांगून प्रशिक्षक हरेंदर सिंग म्हणाले,""आशियाई स्पर्धेसाठी खेळाडू फ्रेश असणे आवश्‍यक होते. विश्रांती मिळाल्यामुळे सर्वच खेळाडू ताजे तवाने असतील. शिबिरात सर्कलच्या आत मिळालेल्या संधी कशा साधल्या जातील यावर अधिक काम केले जाईल.'' 

विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेपूर्वी आशियाई स्पर्धेतील यश किती महत्त्वाचे आहे याची खेळाडूना कल्पना आहे. त्यामुळे शिबिरापासूनच भारतीय खेळाडू अधिक उर्जेने तयारीला सुरवात करतील. 
- हरेंदर सिंग, भारतीय संघाचे प्रशिक्षक

संबंधित बातम्या