Asian Games 2018 : ऍथलेटिक्‍सची अखेर पाच पदकांनी

वृत्तसंस्था
Thursday, 30 August 2018

रिलेत महिलांचा पंचकार 
महिलांच्या 4-400 रिलेत नासेर सल्वा ही बहरीनची सर्वोत्तम धावपटू आहे, हे माहीत असल्याने भारताने आपली सर्वोत्तम धावपटू हिमा दासला सुरुवात करण्यास सांगितले. हे डावपेच चांगलेच यशस्वी ठरले. हिमाने भारताला सुरुवातीलाचा 20-25 मीटरची आघाडी मिळवून दिली आणि ही आघाडी निर्णायक ठरली. त्यामुळे भारताने सलग पाचव्यांदा सुवर्णपदक जिंकले. हिमा दास, एम. आर. पुवम्मा, सरिता गायकवाड आणि व्ही. के. विस्मय्याचा समावेश असलेल्या भारतीय संघाने 3 मिनिटे 28.72 सेकंद अशी वेळ नोंदवली. बहरीनला रौप्यपदक मिळाले. 

जाकार्ता : आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक थोडक्‍यात गमवावे लागलेल्या जिन्सॉन जॉन्सनने पंधराशे मीटर शर्यतीत आपले आशियाई सुवर्णपदकाचे उद्दिष्ट साध्य केले. त्याच्या कामगिरीने तब्बल 56 वर्षांनंतर भारताला या शर्यतीत सुवर्णपदक मिळाले. स्पर्धेत 4-400 रिले शर्यतीत भारतीय महिलांनी सलग पाचव्यांदा सुवर्णपदक जिंकले. 

आशियाई क्रीडा स्पर्धेतील ऍथलेटिक्‍समधील शेवटच्या दिवशी भारतीय ऍथलिट्‌सने दोन सुवर्ण, एक रौप्य व दोन ब्रॉंझपदके जिंकली. यामुळे परदेशी भूमीवर झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण पदकांच्या बाबतीत भारतीय ऍथलिट्‌सची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. 

जॉन्सनचा इतिहास 
बहादूर प्रसादने 1998 च्या स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळविले होते. त्यानंतर पंधराशे मीटरमधील पदक भारतीयांसाठी दुर्मिळ झाले होते. यंदा बहादूर प्रसादचा राष्ट्रीय विक्रम मोडणाऱ्या जिन्सॉनने शर्यतीदरम्यान आघाडीवर असणारा धावपटू आपल्या टप्प्याच्या बाहेर जाणार नाही, यावर लक्ष ठेवले. दीडशे मीटर अंतर शिल्लक असताना इराणच्या आमीर मोरादीने वेग वाढविण्यास सुरुवात केल्यावर जिन्सॉनने इतर प्रतिस्पर्धी जवळ येण्यापूर्वीच स्प्रिंट मारली आणि 3 मिनिटे 44.72 सेकंदांत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आठशे मीटर शर्यतीतील सुवर्णपदक विजेत्या मनजित सिंगला चौथे स्थान मिळाले. 

महिलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत आशियाई विजेत्या पी. यु. चित्राला आफ्रिकेतून आलेल्या बहरीनच्या काकीदान बेफकडू आणि टिगीस बेली यांचे आव्हान पेलविले नाही. 4 मिनिट 12.56 सेकंद वेळ देत चित्राने भारताला स्पर्धेतील पहिले ब्रॉंझपदक मिळवून दिले. थाळीफेकीत सीमा पुनियाने साठ मीटरपेक्षा (62.26 मीटर) अधिक फेक केली. मात्र, तिला सुवर्णपदक कायम ठेवता आले नाही. ती ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. प्रथमच सहभागी झालेल्या संदीप कुमारीला पाचवे स्थान मिळाले. सकाळी 50 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार अपात्र ठरला. पाच हजार मीटर शर्यतीत आशियाई विजेत्या जी. लक्ष्मणनला सहाव्या स्थानावर (14 मि.17.09 सेकंद) समाधान मानावे लागले. 

रिलेत महिलांचा पंचकार 
महिलांच्या 4-400 रिलेत नासेर सल्वा ही बहरीनची सर्वोत्तम धावपटू आहे, हे माहीत असल्याने भारताने आपली सर्वोत्तम धावपटू हिमा दासला सुरुवात करण्यास सांगितले. हे डावपेच चांगलेच यशस्वी ठरले. हिमाने भारताला सुरुवातीलाचा 20-25 मीटरची आघाडी मिळवून दिली आणि ही आघाडी निर्णायक ठरली. त्यामुळे भारताने सलग पाचव्यांदा सुवर्णपदक जिंकले. हिमा दास, एम. आर. पुवम्मा, सरिता गायकवाड आणि व्ही. के. विस्मय्याचा समावेश असलेल्या भारतीय संघाने 3 मिनिटे 28.72 सेकंद अशी वेळ नोंदवली. बहरीनला रौप्यपदक मिळाले. 

पुरुष रिले संघाला मात्र पुन्हा एकदा सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. त्यामुळे तब्बल 56 वर्षांनंतर सुवर्णपदक मिळविण्याची त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. यात भारताने शेवटचे पदक 2006 (रौप्य) च्या स्पर्धेत मिळविले होते. कतारने 3 मिनिटे00.56 सेकंदांच्या नवीन आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. कुन्हू महंमद, ए. धारून, महम्मद अनस आणि आरोक्‍य राजीव या चौकडीने 3 मिनिटे 01.85 सेकंद अशी वेळ नोंदवली. 

पंधराशे मीटरमधील यापूर्वीचे सुवर्णपदक विजेते 
1951- निक्का सिंग 
1962 - मोहिंदर सिंग 

ऍथलेटिक्‍स पदकतालिका 
चीन 12-12-9 
बहरीन 12-6-7 
भारत 7-10-2 
जपान 6-2-10 
कतार 4-2-1 

यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी 
1951 (दिल्ली) 
10-12-12 
1982 (दिल्ली) 
4-9-8 
1978 (बॅंकॉक) 
8-7-3 
2002 (बुसान) 
7-6-4


​ ​

संबंधित बातम्या