आशियाई बॉक्‍सिंग : सलामीलाच चार पदके निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 April 2019

भारतीय बॉक्‍सरनी आशियाई स्पर्धेस जोरदार सुरुवात केली. सतीष कुमार, सोनिया आणि आशिष यांनी उपांत्य फेरीत धडक मारत पदक निश्‍चित केले, तर प्रत्यक्ष स्पर्धेस सुरुवात होण्यापूर्वीच पूजा राणीने भारताचे पदक निश्‍चित केले होते. 

मुंबई : भारतीय बॉक्‍सरनी आशियाई स्पर्धेस जोरदार सुरुवात केली. सतीष कुमार, सोनिया आणि आशिष यांनी उपांत्य फेरीत धडक मारत पदक निश्‍चित केले, तर प्रत्यक्ष स्पर्धेस सुरुवात होण्यापूर्वीच पूजा राणीने भारताचे पदक निश्‍चित केले होते. 

सतीष कुमारने 91 किलोपेक्षा अधिक गटात इराणच्या इमान रमेझानपोड्रोलेवरचा पहिल्या फेरीच्या लढतीत 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. त्याने प्रतिस्पर्ध्यास प्रतिकाराची संधही दिली नाही. अनुभवाच्या जोरावर त्याने जणू आगामी लढतीसाठी सरावच केला. सोनियाने 57 किलो गटात व्हिएतनामच्या दो नाहयान हिला 5-0 आणि आशिषने 69 किलो गटात कॅमेरूनच्या व्ही सोपहोर्सवर 5-0 अशीच बाजी मारली. 

दीपकने 49 किलो गटात व्हिएतनामच्या लोई बुई कॉंग दान्ह याचा 5-0 पाडाव केला तर रोहीत टोकसनेही 64 तैवानच्या चु येन लाई याला 5-0 नमवले. दीपकने जम बसल्यावर दोन्ही हातांचा चांगला समन्वय राखला. त्याचे सरळ ठोसे जास्त ताकदवान तसेच प्रभावी होते, त्यामुळे त्याच्या प्रतिस्पर्ध्याला फारसा प्रतिकारही करता आला नाही. रोहीतचा प्रतिस्पर्धी जास्त आक्रमक होता. पण त्याच्या ठोशात अचूकता नव्हती. त्याचा फायदा रोहीतने पुरेपूर घेतला. किंग कप ब्रॉंझ विजेत्या रोहीतने प्रतिस्पर्ध्यास अक्षरशः खेळवले. लाई अखेरच्या दोन फेऱ्यात डोके सतत खाली झुकवत असल्यामुळे त्याला ताकीद ही देण्यात आली होती. 

भारतीय बॉक्‍सरमसोरील खरे आव्हान उपांत्यपूर्व फेरीपासून सुरु होईल. त्यासाठी आम्ही तयार आहोत, असे पुरुष संघाचे मार्गदर्शक सी ए कुटप्पा यांनी सांगितले. तर महिला बॉक्‍सरसमोरील ड्रॉ संमिश्र आहे, असे महिला संघाचे मार्गदर्शक महम्मद अली कमार यांनी नमूद केले. 

पूजा राणीचे पदक निश्‍चित 
पूजा राणीचे पदक एकही लढत न खेळता निश्‍चित झाले. तिच्या प्रमाणेच सिमरनजीत कौरला पहिल्या फेरीत बाय मिळाला. सिमरनजीत, सीमा पुनिया आणि नुपुरला पदक निश्‍चित करण्यासाठी एक विजय हवा आहे. 


​ ​

संबंधित बातम्या