भारताविरुद्ध लढण्यासाठी पाक-बांगलादेशमध्ये रंगणार युद्ध

सुनंदन लेले
Monday, 24 September 2018

अफगाणिस्तानने सुपर फोर साखळीतील दोन सामने गमावले असले तरी कौतुकाचे धनी मात्र ते झाले आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश संघाला अफगाणिस्तान संघाने खरोखरच घाम फोडला. दोन्ही अनुभवी संघांना अफगाण संघाला पराभूत करताना अनुभवासह सर्वस्व पणाला लावावे लागले. त्याउलट भारतीय संघाने सुपर फोर साखळीतील बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्धचे सामने फारच सहज जिंकले.

दुबई : आशिया करंडक स्पर्धेतील मंगळवारी होणार्‍या दोन सामन्यांपैकी एक सामना उपांत्य फेरीचा आहे आणि दुसरा जास्त मोलाचा नाही असे म्हणले तर तुम्हांला आश्चर्य वाटेल. सुपर फोर साखळी टप्प्यात मंगळवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना दुबईला होणार आहे. ज्याला जास्त मोल नाही कारण भारताने दोन सामने जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आबुधाबीला होणार्‍या दुसर्‍या सामन्याला उपांत्य फेरीतील सामन्याचे महत्त्व आहे कारण पाकिस्तान-बांगलादेश पैकी जो संघ सामना जिंकेल तो शुक्रवारी भारताबरोबर अंतिम सामना खेळणार आहे. 

अफगाणिस्तानने सुपर फोर साखळीतील दोन सामने गमावले असले तरी कौतुकाचे धनी मात्र ते झाले आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश संघाला अफगाणिस्तान संघाने खरोखरच घाम फोडला. दोन्ही अनुभवी संघांना अफगाण संघाला पराभूत करताना अनुभवासह सर्वस्व पणाला लावावे लागले. त्याउलट भारतीय संघाने सुपर फोर साखळीतील बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्धचे सामने फारच सहज जिंकले. मंगळवारी भारतीय संघ अफगाणिस्तानला भिडेल. परंतु या सामन्याच्या निकालाचा स्पर्धेवर काहीही परिणाम होणार नाही. भारतीय संघ बुमरा आणि भुवनेश्वर कुमारला विश्रांती देईल असे वाटते. फलंदाजीत शिखर धवनला विश्रांती देताना कदाचित के. एल. राहुलला संधी मिळू शकते. 

आबुधाबीच्या सामन्याला गुणात्मक स्पर्धेची किनार आली आहे. पाकिस्तानी संघ भारताविरुद्धचा पराभव विसरून बांगलादेशला कसा सामोरा जाणार हा मोठा प्रश्न आहे. बांगलादेश संघाचा खेळही अपेक्षेनुसार झालेला नाही. या सगळ्याचा विचार करताना कोणता संघ दडपण मागे सारून सकारात्मक खेळ करायची हिंमत दाखवेल हेच बघावे लागणार आहे. पाकिस्तानी संघ फलंदाजांकडून चांगल्या खेळाची अपेक्षा करत आहे. फकर झमान , इमाम उल हक सह बाबर आझमला मोठी खेळी सादर करायची तयारी ठेवावी लागणार आहे.     

‘‘आमचा संघ खूप मागे पडला आहे असे मी म्हणणार नाही. भारतीय संघाने संधी मिळताक्षणी आम्हांला ठेचून काढले हे मान्य करावे लागेल. पाकिस्तानी संघातील बरेच खेळाडू अजून दडपणाखाली सर्वोत्तम खेळ करायच्या अनुभवापासून दूर आहेत. आम्ही प्रचंड मेहनत करत आहोत. आज नाही तर उद्या त्याचे फळ आम्हांला मिळेल याची मला खात्री आहे. मंगळवारी बांगलादेश विरुद्ध आम्ही वरचढ खेळ करून दाखवू’’, पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर भारता विरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. अर्थातच संयोजकांकरता मंगळवारी होणार्‍या दुबई मधील सामन्यापेक्षा आबुधाबीचा सामना जास्त महत्त्वाचा आहे.

बरंय ते दोघे समोरच्या संघात नाहीत : चहल
रोहित शर्मा आणि शिखर धवन ज्या तडफेने सध्या फलंदाजी करत आहेत ते बघता वाटतं की, बरंय ते समोरच्या संघात नाहीत. नाहीतर मलाही त्या दोघांना गोलंदाजी करावी लागली असती. आत्ताच्या घडीला शिखर - रोहितला गोलंदाजी करणे फार कठीण आहे. खरंच खूप उच्च दर्जाची फलंदाजी दोघे सहज करत आहेत.

संबंधित बातम्या