Asia Cup 2018 : पाक फलंदाजांचे भारतापुढे लोटांगण

सुनंदन लेले
Wednesday, 19 September 2018

हार्दिक पंड्याच्या पाठीत उसण भरल्याने तो मैदानाबाहेर गेला. कुलदीप यादवने अफलातून गुगली टाकून बाबर आझमची 47 धावांची खेळी संपवली. कुलदीपला शोएब मलिकची विकेटही मिळाली असती पण भुवनेश्वर कुमारने सोपा झेल सोडला. कप्तान सर्फराझने जम बसायच्या आत हवेतून फटका मारायचा प्रयत्न केला. नशिबाची साथ लाभलेल्या शोएबला अखेर अंबाती रायुडुने अफलातून फिल्डींग करताना धावबाद केले.

दुबई : पाकिस्तानी फलंदाजांना हिरो बनायची घाई नडली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी फलंदाजांनी मोठे फटके मारायचा आततायीपणा केला. भारतीय गोलंदाजांनी त्याचा फायदा घेत पाकिस्तानचा डाव 162 धावांवर संपवला. भुवनेश्वर कुमारने वेगवान आणि केदार जाधवने मस्त फिरकी गोलंदाजी करून फलंदाजांना अडचणीत टाकले.

आशिया कप स्पर्धेतील सर्वात महत्त्वाच्या सामन्याकरता संयोजक प्रेक्षक सगळेच वाट बघत होते. भारत वि पाकिस्तान सामना दुबईला पहिल्यांदाच होत असल्याने वेगळा उत्साह जाणवत होता. कामाचा दिवस असून दोनही  संघांच्या पाठीराख्यांनी तिकिटे काढून ठेवली होती. काही रसिक ऑफिसला दांडी मारून मैदानात पहिल्यापासून हजर झाले तर बरेच लोक काम संपवून दुसर्‍या सत्रात मैदानात आले. 

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या फखर झमान आणि इमाम उल हकने फारच लवकर संयम सोडला. इमाम उल हक  भुवनेश्वर कुमारला फटका मारताना तर फखर झमान बुमराला मारताना सोपे झेल देऊन बाद झाले. तिसर्‍या विकेटकरता शोएब मलिकने गुणवान बाबर आझम बरोबर मस्त फलंदाजी केली. शोएब मलिकला धोनीने 26 धावांवर जीवदान दिले. एकेरी धावांबरोबर दोघे फलंदाज मोठे फटके मारताना कचरत नव्हते. 

हार्दिक पंड्याच्या पाठीत उसण भरल्याने तो मैदानाबाहेर गेला. कुलदीप यादवने अफलातून गुगली टाकून बाबर आझमची 47 धावांची खेळी संपवली. कुलदीपला शोएब मलिकची विकेटही मिळाली असती पण भुवनेश्वर कुमारने सोपा झेल सोडला. कप्तान सर्फराझने जम बसायच्या आत हवेतून फटका मारायचा प्रयत्न केला. नशिबाची साथ लाभलेल्या शोएबला अखेर अंबाती रायुडुने अफलातून फिल्डींग करताना धावबाद केले.

असीफ अली आणि शादाब खानला केदार जाधवची फिरकी झेपलीच नाही. हार्दिक पंड्याला दुखापत झाली असताना केदार जाधवने 9 षटकात 3 फलंदाजांना बाद  करून थेट परिणाम साधणारी गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमारने तळातील दोन फलंदाजांना बाद करून पाकिस्तानचा डाव 162 धावांवर संपवला. 

संबंधित बातम्या