Asia Cup 2018 : शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम फेरीत

सुनंदन लेले
Monday, 24 September 2018

भारतीय संघाला विजयापासून रोखायला पाकिस्तानला नव्या चेंडूवर फलंदाज बाद करायचा पराक्रम करावा लागणार होता. पाकिस्तानच्या सर्व योजनांना भारताच्या सलामीच्या जोडीने सुरुंग लावला. रोहित शर्मा आणि शिखर धवनने पहिल्या षटकापासून दडपण न घेता झोकात फलंदाजी केली. शिखर पहिल्यापासून सहजी फटके मारत होता. नजर बसल्यावर रोहितने ठेवणीतून फटके बाहेर काढले. पहिल्यांदा शिखरचे अर्धशतक पूर्ण झाले आणि पाठोपाठ रोहित शर्माचे. 

दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी पाठलाग करत भारतीय संघाने सामना जिंकत अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने सलामीला उभारलेल्या द्विशतकी भागीदारीने सामना जिंकताना भारतीय संघाला अजिबात अडचण आली नाही. फक्त शिखर धवनची विकेट गमावत भारतीय संघाने विजयाकरता लागणार्‍या 238 धावा 39.3 षटकात चोपून काढल्या. शिखर धवनने 114 धावा काढल्या आणि रोहित शर्मा 111 धावा काढून नाबाद राहिला. 

भारतीय संघाला विजयापासून रोखायला पाकिस्तानला नव्या चेंडूवर फलंदाज बाद करायचा पराक्रम करावा लागणार होता. पाकिस्तानच्या सर्व योजनांना भारताच्या सलामीच्या जोडीने सुरुंग लावला. रोहित शर्मा आणि शिखर धवनने पहिल्या षटकापासून दडपण न घेता झोकात फलंदाजी केली. शिखर पहिल्यापासून सहजी फटके मारत होता. नजर बसल्यावर रोहितने ठेवणीतून फटके बाहेर काढले. पहिल्यांदा शिखरचे अर्धशतक पूर्ण झाले आणि पाठोपाठ रोहित शर्माचे. 

अर्धशतकानंतर दोघांच्या अंगात वारे संचारले. प्रत्येक षटकात किमान एक चौकार दोघे फलंदाज मारत होते. फिरकी  गोलंदाजांनी हात मोकळे करायला संधी दिल्यावर रोहित आणि शिखरने तुफान फटकेबाजी केली. त्यातून रोहितचे दोन झेल पाकिस्तानी खेळाडूंनी सोडले. रोहितने सात हजार एक दिवसीय धावांचा टप्पा पार केला. शाहीन अफ्रिदीला कडक चौकार मारून शिखरने 15वे शतक पूर्ण केले. विजयाला थोड्या धावा हव्या असताना शिखर बाद झाला. मग रोहितने 19वे शतक पूर्ण केले. वाढदिवस साजरा करणार्‍या अंबाती रायुडुने रोहितला साथ देत विजयी धावा काढल्या. 

त्या अगोदर सर्फराझ अहमदने प्रथम फलंदाजी करायचा घेतलेला निर्णय अपेक्षित होता. इमाम उल हक आणि फकर झमानने गेल्या सामन्यात केलेल्या चुका टाळल्या. दोघांनी डावाच्या सुरुवातीला मोठे फटके मारायची घाई केली नाही. इमाम पायचित झाला तेव्हा मैदानावरील पंचांनी नाबाद असल्याचा निर्णय दिला होता. धोनीने तिसर्‍या पंचांकडे दाद मागायचा सल्ला दिला जो योग्य ठरला. फकर झमानने एक उत्तुंग षटकार मारून तीस धावांची मजल गाठली. कुलदीप यादवला स्वीपचा फटका मारताना फकर झमान पायचित झाला. पाठोपाठ चांगली फलंदाजी करणारा बाबर आझम धावबाद झाला. 3 बाद 58 धावसंख्येवर पाकिस्तान संघ अडचणीत आला असताना शोएब मलिक - सर्फराझची जोडी मैदानात जमली. 

जम बसवायला थोडा वेळ घेतल्यावर दोघांनी पळून धावा काढण्याचा सपाटा लावला. धावफलक हलता ठेवण्यात दोघांना यश आले. शोएब मलिक झोकात फलंदाजी करत होता. दोन षटकार मारताना त्याने ताकदीपेक्षा टायमिंगवर विश्वास ठेवला होता. समोर खेळणारा सर्फराज मुख्यत्वे करून एकेरी धावा काढून शोएबला मलिकाला खेळायची संधी देत होता.

दोघांची शतकी भागीदारी झाली होती आणि मोठे फटके मारायची वेळ तोंडावर आली असताना सर्फराझला बाद करून कुलदीप यादवने भागीदारी तोडली. 78 धावांची सुंदर खेळी करणार्‍या शोएब मलिकची विकेट नशिबाने मिळाली. बुमराने डाव्या यष्टीबाहेर टाकलेल्या चेंडूवर फ्लीकचा फटका मारताना मलिकचा उडालेला झेल धोनीने बरोबर पकडला.तळातील फलंदाजांनी प्रयत्न करूनही पाकिस्तानला 237ची मजल जेमतेम गाठता आली होती. भारतीय फलंदाजांचा सध्याचा फॉर्म बघता विजयाकरता 238 धावा करणे कठीण गेले नाही.

दिमाखदार विजय साकारताना रोहित शर्मा 111 धावा काढून नाबाद राहिला आणि शिखर धवन शतक काढून बाद झाला. पाकिस्तान विरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयाने 28 तारखेला होणार्‍या अंतिम सामन्यातील आपली जागा भारतीय संघाने पक्की केली.


​ ​

संबंधित बातम्या