Asia Cup 2018 : भारताने घेतला पाकविरुद्ध पराभवाचा बदला 

सुनंदन लेले
Wednesday, 19 September 2018

आशिया कप स्पर्धेतील सर्वात महत्त्वाच्या सामन्याकरता संयोजक प्रेक्षक सगळेच वाट बघत होते. भारत वि पाकिस्तान सामना दुबईला पहिल्यांदाच होत असल्याने वेगळा उत्साह जाणवत होता. कामाचा दिवस असून दोनही  संघांच्या पाठीराख्यांनी तिकिटे काढून ठेवली होती. काही रसिक ऑफिसला दांडी मारून मैदानात पहिल्यापासून हजर झाले तर बरेच लोक काम संपवून दुसर्‍या सत्रात मैदानात आले. 

दुबई : पाकिस्तानी फलंदाजांना हिरो बनायची घाई नडली. भारतीय गोलंदाजांनी त्याचा फायदा घेत पाकिस्तानचा डाव 162 धावांवर संपवला तिथेच विजयाचा पाया रचला गेला. विजयाकरता लागणार्‍या धावा भारतीय फलंदाजांनी आरामात 29 षटकात चोपून काढल्या आणि सामना 8 विकेट्सने जिंकला. रोहित शर्माने अर्धशतक झळकावताना सलामीला शतकी भागीदारी शिखर धवन बरोबर केली.

आशिया कप स्पर्धेतील सर्वात महत्त्वाच्या सामन्याकरता संयोजक प्रेक्षक सगळेच वाट बघत होते. भारत वि पाकिस्तान सामना दुबईला पहिल्यांदाच होत असल्याने वेगळा उत्साह जाणवत होता. कामाचा दिवस असून दोनही  संघांच्या पाठीराख्यांनी तिकिटे काढून ठेवली होती. काही रसिक ऑफिसला दांडी मारून मैदानात पहिल्यापासून हजर झाले तर बरेच लोक काम संपवून दुसर्‍या सत्रात मैदानात आले. 

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या फखर झमान आणि इमाम उल हकने फारच लवकर संयम सोडला. इमाम उल हक  भुवनेश्वर कुमारला फटका मारताना तर फखर झमान बुमराला मारताना सोपे झेल देऊन बाद झाले. तिसर्‍या विकेटकरता शोएब मलिकने गुणवान बाबर आझम बरोबर मस्त फलंदाजी केली. शोएब मलिकला धोनीने 26 धावांवर जीवदान दिले. एकेरी धावांबरोबर दोघे फलंदाज मोठे फटके मारताना कचरत नव्हते.

हार्दिक पंड्याच्या पाठीत उसण भरल्याने तो मैदानाबाहेर गेला. कुलदीप यादवने अफलातून गुगली टाकून बाबर आझमची 47 धावांची खेळी संपवली. कुलदीपला शोएब मलिकची विकेटही मिळाली असती पण भुवनेश्वर कुमारने सोपा झेल सोडला. कप्तान सर्फराझने जम बसायच्या आत हवेतून फटका मारायचा प्रयत्न केला. नशिबाची साथ लाभलेल्या शोएबला अखेर अंबाती रायुडुने अफलातून फिल्डींग करताना धावबाद केले. 

असीफ अली आणि शादाब खानला केदार जाधवची फिरकी झेपलीच नाही. हार्दिक पंड्याला दुखापत झाली असताना केदार जाधवने 9 षटकात 3 फलंदाजांना बाद  करून थेट परिणाम साधणारी गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमारने तळातील दोन फलंदाजांना बाद करून पाकिस्तानचा डाव 162 धावांवर संपवला.

सामना जिंकायच्या जिद्दीने मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने वेगवान गोलंदाजांवर प्रेक्षणीय हल्ला चढवला. मोहंमद आमीर आणि उस्मान खानला रोहितने तगडे फटके लगावले. रोहितने मारलेला एक षटकार तर पहिल्या मजल्यावरच्या प्रेक्षकांत जाऊन पडला. वेगाची भिती तर सोडाच उलट दोघे भारतीय फलंदाज त्याच वेगाचा फायदा घेऊन चेंडू टोलवत राहिले.  तडाखेबाज अर्धशतक करून रोहित शर्मा शादाबला बोल्ड झाला. शिखर धवन अर्धशतकापासून 4 धावा दूर असताना बाद झाला. विजया करता जेमतेम 60 धावा करायच्या बाकी असल्याने रायुडु आणि दिनेश कार्तिकवर कोणतेच दडपण आले नाही. 

संबंधित बातम्या