Asia Cup 2018 : कर्णधार म्हणून माझ्यासाठी मोठी स्पर्धा : रोहित

सुनंदन लेले
Monday, 17 September 2018

आशिया करंडक स्पर्धेचा ढाचा असा आहे, की प्रत्येक सामन्याला मोल आहे. पहिल्या सामन्यात आमचा प्रतिस्पर्धी हाँगकाँग अनुभवाने कमी असला तरी आम्ही संपूर्ण तयारीने सामन्यात उतरणार आहोत. समोर खेळणार्‍या संघाकडे नाही आमच्या खेळाकडे बघणार आहोत, असे भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

दुबई : आशिया करंडक स्पर्धेचा ढाचा असा आहे, की प्रत्येक सामन्याला मोल आहे. पहिल्या सामन्यात आमचा प्रतिस्पर्धी हाँगकाँग अनुभवाने कमी असला तरी आम्ही संपूर्ण तयारीने सामन्यात उतरणार आहोत. समोर खेळणार्‍या संघाकडे नाही आमच्या खेळाकडे बघणार आहोत, असे भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

आशिया करंडकात आम्ही काही खेळाडूंनी संधी देणार आहोत. अंबाती रायडू आणि केदार जाधव तंदुरुस्त होऊन संघात परतत आहेत. मोहंमद खलील संघात नव्याने दाखल होतोय ज्याच्यात खूप गुणवत्ता आहे. दुबईमध्ये खेळणे कठीण जाणार आहे कारण सामना दुपारी चालू होत असला तरी गरम हवा असणारच. खेळपट्टी गरम हवेने संथ होत जाणार ज्याच्याशी आम्हाला जुळवून घ्यावे लागेल. विराट कोहली नसताना मी श्रीलंकेत संघाचे नेतृत्व केले होते. खरं सांगायचे तर कर्णधार म्हणून माझ्याकरता ही सर्वांत मोठी स्पर्धा असेल, असे रोहित म्हणाला.

भारताची लढत नवख्या हाँगकाँग बरोबर 
नवख्या हाँगकाँग संघासोबतच्या सामन्याने आशिया करंडक स्पर्धेतील भारताच्या आव्हानाला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. विराट कोहली संघात नसला तरी भारताचा एक दिवसीय संघ मजबूत आहे. त्यातून पहिला सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या हाँगकाँग संघासोबत असल्याने दुबईच्या अति गरम हवामानाशी जुळवून घ्यायला खेळाडूंना थोडे बरे पडणार आहे. 

संघातील नावांवर नजर टाकली कि लगेच समजते कि एक अर्थाने हाँगकाँगचा संघ म्हणजे गोळा ११ आहे. अंशुमन रथ संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्या बरोबर शहा, बाबर, एहसान खान अशी नवे यादीत दिसतात. पात्रता फेरीत चांगला खेळ करून हाँगकाँग संघ मुख्य स्पर्धेत दाखल झाला असला तरीही भारत आणि पाकिस्तान सारख्या तगड्या संघांसोबत दोन हात करायचा अनुभव त्यांच्या पाठीशी नाहीये. 

भर वाळवंटात उभारलेल्या दुबई स्पोर्ट्स सिटी आवारातील स्टेडियममध्ये भारताचे सामने रंगणार आहेत. १८ सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज घेतील आणि लगेच दुसऱ्या दिवशी पाकिस्तान सोबत महत्वाचा सामना खेळेल. 

साखळी स्पर्धेतील तीन सामन्यातून रवी शास्त्री एक दिवसीय संघातील फलंदाजांच्या मधल्या फळीचा शोध घेईल. अंबाती रायडू आणि केदार जाधव या दोन खेळाडूंवर संघ व्यवस्थापन खास लक्ष ठेऊन असेल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वाजता सामना चालू होणार आहे.

संबंधित बातम्या