Asia Cup 2018 : बांगलादेशकडून श्रीलंकेचा धुव्वा

वृत्तसंस्था
Sunday, 16 September 2018

या आव्हानासमोर श्रीलंकेच्या सलामीवारांनी आक्रमक सुरवात केली. उपुल थरंगाने चौकार, षटकार मारले पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांनी एकामागून एक श्रीलंकेचे बळी घेत एकाही फलंदाजाला स्थिरावू दिले नाही. अखेर श्रीलंकेचा डाव 124 धावांत संपुष्टात आला. 

दुबई : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यातच बांगलादेशने श्रीलंकेचा धुव्वा उडविल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या 124 धावांनी संपवून 137 धावांनी विजय मिळविला.

श्रीलंकेविरुद्ध बांगलादेशने 261 धावांपर्यंत मजल मारली. पुनरागमन केलेल्या लसित मलिंगाची हॅटट्रिक हुकली. त्याने एकूण चार विकेट्‌स घेतल्या, पण रहीमच्या 144 धावांच्या खेळीमुळे बांगलादेशला संघर्षपूर्ण आव्हान उभे करता आले. बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तझाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. मलिंगाने पाचव्या चेंडूवर लिटन दास व सहाव्या चेंडूवर शकीब अल हसन यांना शून्यावर गारद केले. पुढील षटकात रहीमने त्याची हॅटट्रिक हुकविली. त्यानंतर तमिम इक्‍बालला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. अशावेळी रहीमला महंमद मिथुनने चांगली साथ दिली. या जोडीने 131 धावांची भागीदारी केली. मलिंगाने मिथुनला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर दुसऱ्या बाजूने विकेट पडत असताना रहीमने किल्ला लढविला. त्याने 123 चेंडूंत शतक पूर्ण केले, पण तीन चेंडू बाकी असताना तो बाद झाला व बांगलादेशचा डाव संपला. 

या आव्हानासमोर श्रीलंकेच्या सलामीवारांनी आक्रमक सुरवात केली. उपुल थरंगाने चौकार, षटकार मारले पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांनी एकामागून एक श्रीलंकेचे बळी घेत एकाही फलंदाजाला स्थिरावू दिले नाही. अखेर श्रीलंकेचा डाव 124 धावांत संपुष्टात आला. 

संक्षिप्त धावफलक 
बांगलादेश : 49.3 षटकांत सर्वबाद 261 (मुशफीकउर रहीम 144-150 चेंडू, 11 चौकार, 4 षटकार, महंमद मिथुन 63-68 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, मेहीदी हसन मिराझ 15, लसित मलिंगा 10-2-23-4, सुरंगा लकमल 1-46, धनंजय डीसिल्वा 2-38) विजयी वि. श्रीलंका : सर्वबाद 124 (थरंगा 27, दिलरूवान 29, मुशफिकूर 2-20, मेहंदी हसन 2-21, मुशर्रफी मुर्तझा 2-25)

संबंधित बातम्या