जागतिक मैदानी स्पर्धा : आशियाचे योगदान नगण्यच

नरेश शेळके
Tuesday, 17 September 2019

जागतिक ऍथलेटिक्‍स म्हटले की, अमेरिका, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील देश यांचीच नावे प्रामुख्याने पुढे येतात. ओशानिया फक्त न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियापुरते मर्यादित आहे. आशियाई देशांचे जागतिक ऍथलेटिक्‍समधील स्थान म्हणजे ब्लॉकबस्टर चित्रपटात कधीतरी झळकणाऱ्या एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या भूमिकेसारखे आहे. त्यात चीन म्हणजे एक स्थिरावलेले प्रस्थ असेच म्हणावे लागेल. कारण, आशियातील योगदानात त्यांचे स्थान वरचे आहे. 

जागतिक ऍथलेटिक्‍स म्हटले की, अमेरिका, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील देश यांचीच नावे प्रामुख्याने पुढे येतात. ओशानिया फक्त न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियापुरते मर्यादित आहे. आशियाई देशांचे जागतिक ऍथलेटिक्‍समधील स्थान म्हणजे ब्लॉकबस्टर चित्रपटात कधीतरी झळकणाऱ्या एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या भूमिकेसारखे आहे. त्यात चीन म्हणजे एक स्थिरावलेले प्रस्थ असेच म्हणावे लागेल. कारण, आशियातील योगदानात त्यांचे स्थान वरचे आहे. 

दोहा येथे यंदा जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धा होत आहे. तर, पुढील वर्षी जपानमध्ये ऑलिंपिक स्पर्धा होत आहे. त्यामुळे ऍथलेटिक्‍समध्ये आशियाई देशांचे स्थान काय राहील, हा प्रश्‍न विचारला जात आहे. 1983पासून 2017च्या जागतिक स्पर्धेपर्यंत एकूण 730 सुवर्ण, 738 रौप्य आणि 730 ब्रॉंझपदके दिली गेली. महम्मूद गझनीने जसे भारतातून सोने लुटून नेले त्याप्रमाणे ही सर्व पदके अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, ओशिनिया खंडातील देशांनी लुटून नेली, असे म्हणावे लागेल. आशियाई देशांच्या वाट्याला आली फक्त एकूण 110 पदके. म्हणजे जेमतेम 5 टक्के. साहजिकच यात चीन (16-22-18) व जपानचा (4-7-15) वाटा अधिक आहे. आशियाईतील 42 पैकी फक्त 12 देशांना आतापर्यंत पदकतालिकेत स्थान मिळविता आले आहे.

गतस्पर्धेचा विचार केला तर एकूण 145 पदकांपैकी आशियाई देशांनी एकूण 16 पदके जिंकली. म्हणजे जवळजवळ 9 टक्के. यात वाढ होऊ शकते का, असा प्रश्‍न कुणी विचारला तर याचे उत्तर "हो' असेच आहे. कारण, सुधारणेला आणि प्रगतीला नेहमीच वाव असतो. त्यासाठी फक्त चीन, जपानव्यतिरिक्त इतर देशांनी आपले योगदान वाढविण्याची गरज आहे. सुदैवाने अंजू जॉर्जच्या ब्रॉंझपदकामुळे भारताचे योगदान आशियात दिसून येते. दोन पदकांमुळे श्रीलंकेचे स्थान आपल्यापुढे आहे. यंदाही चित्र बदलेल असे वाटत नाही. असो. यंदा चीन, जपानसोबत आफ्रिकेतून आयात केलेल्या ऍथलिट्‌सच्या जोरावर मक्तेदारी गाजविणाऱ्या बहरीनवर मदार आहे. जपानला मॅरेथॉन व चालण्याच्या शर्यतीत आशा आहे.

चीनची मदार महिला गोळाफेकीतील विद्यमान विजेती गॉंग लिजीओ, भालाफेकीतील रौप्यपदक विजेती ल्यु हुईहुई यांच्यासोबत महिलांच्या 20 व 50 किलोमीटर चालण्याची शर्यत, महिला हतोडाफेकीत विद्यमान आशियाई विजेती झेंग वॅंग यांच्यावर आहे. यजमान कतारकडून फारशा आशा नसल्या, तरी त्यांचे शेजारी बहरीन या वेळी बऱ्यापैकी आघाडी घेईल, असे चित्र आहे. कारण, महिलांत सल्वा नासेर (400 मीटर), शिताये इशिते (10000), विन्फ्रेड यावी (3000 स्टीपलचेस), तर पुरुषांत बिरहानू बालेव (5000 मीटर) या आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंचा बहरीन संघात समावेश असल्याने आशियाच्या योगदानात वाढ होईल, अशी माफक अपेक्षा आहे. याशिवाय सीरियाचा मजद गझल (उंच उडी) आणि व्हिएतनामचा चाओ चेंग (भालाफेक) यांनाही संधी आहे. 

आशियाई देशांची एकूण कामगिरी 
सुवर्ण 27, रौप्य 36, ब्रॉंझ 47 
गतस्पर्धेतील (लंडन) कामगिरी 
4-5-7 
पहिला आशियाई पदकविजेता 
पुरुष : झु जिनहुआ (चीन-उंच उडी -ब्रॉंझ- 1983) 
महिला : यान होंग (चीन-10किमी चालणे - ब्रॉंझ - 1987). 

(सोव्हियतचे विभाजन झाल्यानंतर जे देश आशियात आले, त्यानंतरची त्यांची कामगिरी विचारात घेण्यात आली आहे).


​ ​

संबंधित बातम्या