आव्हान आपलेच; पण सतर्क राहायला हवे

अशोक शिंदे
Sunday, 19 August 2018

कबड्डी सातासमुद्रापार फार खेळली जात नसली, तरी प्रो-कबड्डीच्या माध्यमातून ती सातासमुद्रापार असणाऱ्या घराघरांत निश्‍चित पोचली आहे. ही स्पर्धा आशियाई असल्याने आशियातील पाकिस्तान, बांगलादेश, इराण, जपान, कोरिया हे संघ या खेळाशी चांगलेच परिचित आहेत. आजपर्यंत भारताचे वर्चस्व राहिले असल्यामुळे हे सर्व देश भारतीय संघ आणि खेळाडूंचा घरचा अभ्यास पूर्ण करूनच मैदानात उतरतील.

कबड्डी सातासमुद्रापार फार खेळली जात नसली, तरी प्रो-कबड्डीच्या माध्यमातून ती सातासमुद्रापार असणाऱ्या घराघरांत निश्‍चित पोचली आहे. ही स्पर्धा आशियाई असल्याने आशियातील पाकिस्तान, बांगलादेश, इराण, जपान, कोरिया हे संघ या खेळाशी चांगलेच परिचित आहेत. आजपर्यंत भारताचे वर्चस्व राहिले असल्यामुळे हे सर्व देश भारतीय संघ आणि खेळाडूंचा घरचा अभ्यास पूर्ण करूनच मैदानात उतरतील. अर्थात, या देशांनी कितीही प्रयत्न केले, तरी ते भारताला प्रतिआव्हान देऊ शकत नाहीत हे तितकेच खरे आहे. तेवढी कबड्डी त्यांच्याकडे पुढे गेलेली नाही. तांत्रिकतेच्या आघाडीवर आपल्यावर कुणीच मात देऊ शकणार नाही. मात्र, म्हणून फाजील आत्मविश्‍वास बाळगून भारतीय खेळाडूंनी गाफील राहू नये. संघ नियोजन कसे अमलात आणले जाईल, याची काळजी त्यांनी घ्यायची आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसारख्या मोठ्या व्यासपीठावर सतर्कता बाळगलेली केव्हाही चांगली. 

भारतीय पुरुष संघाची सलामीची लढत बांगलादेशाशी आहे. त्यांचे काही खेळाडू प्रो कबड्डी खेळले आहेत. त्यामुळे त्यांना कबड्डी आणि भारतीय कबड्डीची चांगली ओळख आहे. त्यांचे कव्हर चांगले आहे. त्यामुळे मैदानावर उतरताना योग्य नियोजन आणि संघ निवड महत्त्वाची ठरते. उजवा कोपरा सहसा सामना लावून धरणारा म्हणा किंवा तारणारा असतो. त्यामुळे येथे अनुभवी संदीप नरवालला संधी मिळते, की नवोदित मल्लेश्‍वरला निवडले जाते हे महत्त्वाचे आहे. निवडले कुणी जावो त्याने आपण देशासाठी खेळतोय याचे भान ठेवून खेळावे इतकेच. प्रो कबड्डीतून अनेक स्टार उदयास आले, गळ्यातील ताईत बनले; पण देशासाठी खेळायचे म्हटल्यावर दडपणाखाली ते आपला खेळ दाखवू शकत नाहीत. अशा वेळी अजय ठाकूरचा खेळ निर्णायक ठरणार आहे. हा खेळाडू असा आहे, की तो कुठल्याही क्षणी सामना फिरवू शकतो. त्याची खोलवर चढाई प्रतिस्पर्ध्याला गांगरून टाकते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुरवातीला प्रतिस्पर्ध्याकडे लीड जाणार नाही याची काळजी घ्यायची. 

महिलांमध्ये पायल आणि कविता या दोन खेळाडू सोडल्यास सर्व खेळाडू नवोदित आहेत. पण, प्रत्येक खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे म्हणून त्यांची निवड झाली आहे. महिलांमध्ये इराण संघ तगडा आहेच. पण, जपानला कमी लेखून चालणार नाही. गेल्या काही वर्षांत त्यांनी जबरदस्त प्रगती केली आहे. विशेष म्हणजे त्या जगासमोर आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा खेळ आपल्याला नवखा ठरू शकतो. त्यामुळेच आपला लौकिक राखताना अतिउत्साहाच्या नादात छोटीशी देखील चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ही छोटीशी चूक पुढे जाऊन देशासाठी महाग पडू शकते. जेवढा संयम आपले खेळाडू राखतील, तेवढा तो चांगला. शेवटी कुठल्याही मोहिमेची सुरवात विजयी झाली की चांगले असते. पुढचा मार्ग सोपा होतो. 

संबंधित बातम्या